Published On : Fri, Aug 6th, 2021
By Nagpur Today Nagpur News

घरातून कचरा उचलला किंवा नाही, क्यू.आर.कोड सांगेल

Advertisement

‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ अंतर्गत नागरिकांच्या घरावर आता ‘क्यूआर कोड’

प्रायोगिक तत्वावर धरमपेठ झोनमधून सुरुवात : महापौरांनी केली पाहणी

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर: गाडी घरापर्यंत येत नाही. त्यामुळे नियमित कचरा उचलल्या जात नाही, अशा नागरिकांच्या नेहमीच्या असणाऱ्या तक्रारींवर आता यापुढे लगाम बसणार आहे. ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून आता कुठल्या घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही, याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. यामुळे कचरा संकलनाची व्यवस्था आता अधिक व्यापक आणि पारदर्शक होणार आहे.

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत नागरिकांच्या घरांवर असे क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेकडे सतत प्राप्त होणाऱ्या या तक्रारीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी असलेल्या या अभिनव नवीन व्यवस्थेमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रविनगर अमरावती रोड येथील मरारटोली आणि पीॲण्डटी कॉलनीतील दहा घरांमध्ये हे क्यूआर कोड स्टिकर लावण्यात आले आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी या कोड वर आपल्या मोबाईल द्वारे स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. महाराष्ट्रात पहिल्यांदा नागपूर शहरात ही क्यूआर कोड सिस्टीम लावण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल. नागरिकसुद्धा या व्यवस्थेमुळे समाधानी आहेत.

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हे शक्य झाले. गुरुवारी (ता. ५) महापौरांनी या दहा घरांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि याबद्दल माहिती प्राप्त करून घेतली. या व्यवस्थेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले. स्मार्ट सिटी आणि नागपूर मनपातर्फे ही नवीन अभिनव व्यवस्था उभी करण्यात आली आहे. बग्स फ्री सोलुशन कंपनीतर्फे दहा घरात प्रयोगिक तत्त्वावर क्यू आर कोड स्टिकर लावण्यात आले आहे. महापौरांच्या उपस्थितीत कचरा गाडी तिथे आली, स्वच्छता कर्मचारी यांनी घरात लावलेले क्यू आर कोड स्कॅन करून कचरा घेतला आणि त्याचे वजन करून कचरा गाडीमध्ये टाकला. याप्रसंगी महापौरांनी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांनी या प्रक्रियेत मनपा व स्मार्ट सिटीला सहकार्य केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रही दिले. महापौरांच्या हस्ते व्ही.के. मोटघरे, सतीश गायकवाड, रवींद्र देवगडे, लाल मोहन मेश्राम, बीपी गोपलानी, सुनील गेडाम, मनीष दुबे, श्रीकांत खंडाते, मुकुंद खंडाते व सोहनलाल गुप्ता यांना प्रमाणपत्र देण्यात आले. वाहन चालक विनोद तुमडाम यांना सुद्धा महापौरांनी प्रमाणपत्र दिले.

यावेळी माध्यमांशी चर्चा करताना महापौर तिवारी म्हणाले, घरोघरी कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत वेळेवर येत नाही, अशी नगरसेवक आणि नागरिकांची तक्रार होती. त्यांच्या वेळासुद्धा निश्चित नसतात. आता स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट सिटी व मनपा यांच्या सहकार्याने तक्रारींचे निराकरण करणे शक्य होणार आहे. कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत ज्या घरातील कचरा घेईल त्याचा घर क्रमांक, घरमालकाचे नाव संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. असा अभिनव प्रयोग करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. हा प्रयोग अधिकाऱ्यांशी चर्चा करून एका झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण शहरात लागू करण्याचा विचार करू. या माध्यमातून नागरिकांची कचऱ्याची समस्या सोडविण्याची नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असेही महापौरांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना बग्स फ्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दिग्विजय येनुरकर म्हणाले, या व्यवस्थेमध्ये नागरिकांना कचरा गाडी येण्याची वेळ अगोदरच माहिती होईल. तसेच स्वच्छतादूताने कचरा उचलला अथवा नाही, याची माहिती मनपालाही मिळेल. या व्यवस्थेमुळे कचरा संकलनाच्या कार्यात सुसूत्रता येईल. यावेळी स्वच्छता विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल अधिकारी दिनदयाल टेंभेकर, कंपनीचे विशाल कोठारी, श्रीधर, कार्तिक ओझा आणि हिरेन पाठक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement