महापौर दयाशंकर तिवारी यांची माहिती : ‘आझादी-७५’निमित्त विविध उपक्रम
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातील पदार्पणानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘आझादी-७५’ या संकल्पनेसह मनपाद्वारे स्वातंत्र्यदिनाला १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) शंकरनगर उद्यान, दिघोरी दहन घाटाजवळील सेनापतीनगर उद्यान व लकडगंज येथील म्हाडा कॉलनी उद्यान या तिन्ही उद्यानातील एस.टी.पी.चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
शंकरनगर उद्यानामध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याशिवाय खासदार डॉ.विकास महात्मे यांच्यासह शहरातील आमदार सर्वश्री नागो गाणार, गिरीश व्यास, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे,विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच मनपातील पदाधिका-यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘आझादी-७५’ निमित्त आयोजित कार्यक्रमासंदर्भात शुक्रवारी (ता.१३) महापौर कक्षामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या समवेत उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी विद्युत निर्मितीसाठी मनपाद्वारे देण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मनपाला महसूल प्राप्त होत आहे. काही वर्षापूर्वी विद्यमान सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या प्रभागातील उज्वलनगर उद्यानात अश्याप्रकारचे एस.टी.पी.उभारण्यात आले होते. हीच संकल्पना पुढे नेत शहरातील १२ उद्यानांलगत छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (मिनी एसटीपी) उभारण्याची मनीषा माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी व्यक्त केली होती व त्यादृष्टीने कार्यही केले. त्यांच्या या पुढाकाराला सहकार्य करीत शहरातील विविध १२ उद्यानालगत वाहत असलेल्या नाल्यावर छोटे सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. स्वातंत्र्य दिनाला संबंधीत कंत्राटदाराद्वारे शहरातील तीन एसटीपी पूर्ण करण्यात आले असून त्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. या एसटीपी मधील पाणी उद्याने, क्रीडा मैदाने, बांधकामासाठी वापरण्यात येईल. मनपाद्वारे यासाठी चार हजार लीटरचे विशेष टँकर राहणार असून या टँकरचा रंग लाल राहिल व त्यावर ‘पुनर्वापरासाठी पाणी’ (रिसायकल वाटर) असे लिहिलेले असेल. चार हजार लीटरच्या एका टॅंकरकरिता पाण्याचा खर्च २०० रुपये व डिझेल आणि वाहतूक खर्च ३०० रुपये असे एकूण ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम प्रकल्प असून या प्रकल्पाचे संचालन पूर्णत: सौर ऊर्जेवर राहणार आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. शहरातील सर्व १२ एसटीपी तयार झाल्यास नागपूर शहरातील भूजलातील पाण्याची एका वर्षात अंदाजे ४ कोटी लीटर एवढी बचत होणार आहे, असेही ते म्हणाले.
शहरातील महत्वाच्या ठिकाणी रोषणाई
७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूर शहरातील महत्वाच्या ठिकाणी मनपातर्फे रोषणाई करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील महापुरूषांचे स्मारक, पुतळे यांची स्वच्छता करून महापुरुषांच्या स्मारक तथा पुतळ्यांना माल्यापर्ण केले जाईल व त्या ठिकाणी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रोषणाई करण्यात येणार आहे. याशिवाय शनिवारी (ता.१४) सायंकाळी शहरातील ७५ सामाजिक संस्थांद्वारे शहरातील ७५ चौकांमध्ये रात्री ८ वाजतापूर्वी कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.