स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अखंड भारत संकल्प दिन
नागपूर : हजारो वर्षांपूर्वी सम्राट अशोकांच्या कालखंडात भारताची, ‘भारतीय उपखंड’ अशी ओळख होती. ज्यात आज भारतापासून विलग झालेले पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मॅनमार यांचा समावेश होता. देशावर मौर्य, मुघल आणि ब्रिटिशांनी राज्य केले. ब्रिटिशांना देशात आपली सत्ता टिकवायची होती, त्यासाठी त्यांना देशाची फाळणी अपेक्षित होती. त्यादृष्टीने त्यांनी धर्माच्या आधारावर राष्ट्राची फाळणी केली. आज अखंड भारत संकल्प दिनानिमित्त या भारत देशाच्या अखंडतेच्या दृष्टीने पुढाकार घेऊन मैत्रीचे पाऊल पुढे टाकूया. आपला आजचा हा पुढाकार म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रुजविलेले अखंड भारताचे बीज असून ते पुढील काळात त्याचे बलाढ्य वटवृक्षात रूपांतर होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरातील ७५ ठिकाणांसह संपूर्ण देशात अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत प्रभाग २३ व २६ च्या वतीने आयोजित अखंड भारत संकल्प दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले. मंचावर उपमहापौर मनीषा धावडे, माजी उपमहापौर मनीषा कोठे, दुर्बल घटक समिती सभापती कांता रारोकर, नागपूर शहर भाजपाचे महामंत्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी नगरसेवक महेंद्र राऊत, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, प्रभाग २३ व २६ चे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पूर्व नागपूर महामंत्री पिंटू पटेल यांनी परिश्रम घेतले.
आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात ऍड. धर्मपाल मेश्राम पुढे म्हणाले, देशावर तब्बल ७०० वर्ष मुस्लिमांनी राज्य केले. आज भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ज्या तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या १५ शहरांवर कब्जा केलाय ते सर्व याच उपखंडातील रहिवासी असून याच मातीत त्यांचा जन्म झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनीही दिल्लीत एका पत्रकार परिषदेत हा देश हिंदू, बौद्ध, शिख, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा सर्वांचा आहे, असे सांगितले होते. राष्ट्रीयत्व हे आमच्या रक्तात असून तेच भारतीयत्व आहे व सर्वसमावेशकता हीच आमची जीवनपद्धती आहे. राष्ट्रीयत्व हे शरीर असेल तर हिंदूत्व हा त्याचा आत्मा आहे. आज भारतापासून विलग झालेल्या देशांची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यावेळी देश एकोप्याने वागला असता, अखंड म्हणून राहिला असता तर आज भारत महासत्ता असता, असेही ऍड. मेश्राम म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला हिंदू कोडबिल दिले व त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामाही दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय जनसंघ व जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारने सुधार न स्वीकारल्याने राजीनामा दिला. आज देश समान नागरी कायद्याच्या दिशेने जात आहे. या कायद्याचे पाहिले पाऊल हिंदू कोडबिल हेच आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशाचे प्रधानमंत्री म्हणून नेतृत्व स्वीकारल्यानंतर अनेक बदल घडवून आणले. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा हे त्यातील एक. इतर देशातील हिंदू, बौद्ध, शीखांना त्यांच्या रहिवासी देशात नागरिकत्व नाकारल्यास त्यांना आपल्या भारत देशाने स्वीकारणे ही अखंडतेची वाटचाल आहे. हे सर्व कायदे देशाला समानतेच्या दिशेने पुढे नेणारे आहेत. बाबासाहेबांच्या हिंदू कोडबिलचा आधार असलेले हे समान नागरी कायद्याचे विधेयक देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या दिवशी लागू करतील त्या दिवशी जाती, धर्म पंथ, भाषा, भोजनपद्धती या सर्वांच्या पलीकडे हा देश खऱ्या अर्थाने समान नागरी कायद्याच्या दृष्टीने एकसंघ होईल आणि हा तो दिवस निश्चितच उजाडेल, असा विश्वासही ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करतांना आम्ही असू वा नसू पण पुढील पंच्याहत्तर वर्षात अखंड भारताची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल व त्याची गोड फळे पुढील पिढीला निश्चीत चाखायला मिळतील व मोदीजींच्या नेतृत्वात त्याची सुरूवात झालेली असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.