अंतिम मंजुरीसंदर्भात सभागृहात होणार चर्चा
नागपूर: नागपूर शहरातील क्रीडा वातावरणाला चालना मिळावी, शहरातील जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळवावे याउद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे क्रीडा धोरण तयार करण्यात येत आहे. क्रीडा धोरण अंतिम टप्प्यात आले असून ते क्रीडा विशेष समितीद्वारे सोमवारी (ता.२३) एकमताने पारीत करण्यात आले.
विविध विषयांच्या अनुषंगाने सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये क्रीडा विशेष समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती प्रमोद तभाने, उपसभापती लखन येरवार, सदस्य शेषराव गोतमारे, हरीश ग्वालबंशी, सदस्या जिशान मुमताज मो. इरफान अंसारी, उपायुक्त विजय देशमुख, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.
यावेळी नागपूर महानगरपालिकेद्वारे निर्धारित करण्यात आलेले क्रीडा धोरण लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती एकमताने सभापती प्रमोद तभाने यांनी क्रीडा धोरण पारीत झाल्याचे जाहीर केले. क्रीडा धोरणासंबंधी ठराव पारीत झालेला असला तरी त्यामध्ये वेळेनुरूप आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार हे महापौर आणि मनपा आयुक्तांना राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत त्यासंदर्भात कार्यवाहीचे विभागाला निर्देश दिले. क्रीडा धोरणामध्ये कुस्ती या खेळासंबंधी सुविधेसंदर्भात प्रावधान अंतर्भूत करण्याची सूचना यावेळी समितीचे सदस्य हरीश ग्वालबंशी यांनी केली. अनेक वर्षांपासून नागपूर शहरातून एकही कुस्तीपटू पुढे आलेला नसल्याने याकडे विशेष लक्ष देत त्यासंबंधी प्रावधान करण्याची त्यांनी सूचना केली. क्रीडा धोरणामध्ये ऑलिम्पिकमधील सर्वच खेळ अंतर्भूत करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा अधिका-यांनी यावेळी दिली.
नागपूर शहरामधील सहा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एक मैदान विकसीत करण्यात येत असून त्याच्या कार्यवाहीचा यावेळी क्रीडा समिती सभापतींनी आढावा घेतला. मनपाकडे हस्तांतरण असलेल्या मैदानांची निवड करण्यात आली असून आतापर्यंत समितीद्वारे ६ पैकी मरारटोली, प्रेमनगर, जुनी बस्ती, बापू नगर आणि महावीर नगर या ५ मैदानांची पाहणी करण्यात आली. या मैदानांच्या विकासासाठी निधीचे प्रावधान झाले असून यासंबंधी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी दिले. धरमपेठ झोन अंतर्गत गांधीनगरमधील डागा लेआउट येथील स्केटिंग रिंगच्या सद्यस्थितीचा सुद्धा यावेळी समितीद्वारे आढावा घेण्यात आला. या रिंगमधून उत्तम स्केटर्स घडावेत यासाठी मनपाद्वारे प्रयत्न सुरू असून यासाठी प्रशिक्षण देणा-या संस्थेची निवड केली जाणार आहे. मात्र संस्थेची निवड करताना संस्थेमधील खेळाडू हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त असावा ही अट अंतर्भूत करणे अत्यावश्यक आहे. मुलांना उत्तम प्रशिक्षण मिळावेत व पुढे त्यांनी स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करावी, याउद्देशाने ही अट अंतर्भूत करण्याचे निर्देश क्रीडा समिती सभापतींनी दिले.
यशवंत स्टेडियम येथे नियमित स्वच्छता होत नाही तसेच सद्यस्थितीत तेथे गवत वाढले असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यासंदर्भात विभागाद्वारे त्वरीत कार्यवाही करून सदर ठिकाणची स्वच्छता आणि गवत कापण्याचे निर्देशही समिती सभापती प्रमोद तभाने यांनी दिले.
गत ५० वर्षातील क्रीडा कार्यावर लघुपट बनणार
नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा समितीद्वारे आतापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयामुळे शहरातील क्रीडा क्षेत्रात अनेक फायदे झाले. हे कार्य आणि आगामी योजना यांची जनतेला माहिती व्हावी यादृष्टीने मनपाद्वारे क्रीडा विभागाद्वारे गत ५० वर्षात केलेल्या कार्यावर लघुपट तयार करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रशासनाद्वारे कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा समिती सभापतींनी बैठकीत दिले. याशिवाय २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. यादिवशी रविवार असल्याने शासकीय सुट्टी असली तरी क्रीडा समितीचे सर्व सदस्य आणि क्रीडा विभागातील सर्व अधिकारी यांनी मनपामध्ये उपस्थित राहून मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे निर्देशही सभापतींनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये खासगी शाळांप्रमाणेच क्रीडा सुविधा असाव्यात अशी सूचना समिती सदस्य हरीश ग्वालबंशी यांनी केली. स्पर्धेमध्ये मनपाचे विद्यार्थी मागे राहू नयेत, त्यांना शाळेतच क्रीडा वातावरणाशी संबंधी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. यादृष्टीने प्राथमिक स्तरावर एखाद्या शाळेमध्ये असा पायलट प्रकल्प राबविण्याचीही त्यांनी सूचना केली.