Published On : Tue, Aug 31st, 2021
By Nagpur Today Nagpur News

प्रभागनिहाय नियुक्त कर्मचा-यांच्या मदतीने फवारणीला गती द्या

Advertisement

आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांचे निर्देश

नागपूर : शहरात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक झोनमध्ये प्रभागनिहाय धूरफवारणी कार्याकरिता प्रत्येकी एक कर्मचारी नगरसेवकांच्या अखत्यारित देण्यात आले आहे. या फवारणी कर्मचा-यांच्या माध्यमातून प्रभागनिहाय धुरफवारणी कार्यक्रमाला गती देण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी दिले.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विविध विषयांच्या अनुषंगाने सोमवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ.गजेंद्र महल्ले, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते. ऑनलाईन माध्यमातून समितीचे उपसभापती विक्रम ग्वालबंशी, सदस्य नागेश मानकर, सदस्या भावना लोणारे, विद्या कन्हेरे, मलेरिया, हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख दीपाली नासरे आदी जुळले होते.

यावेळी हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख दीपाली नासरे यांनी डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत प्रशासनातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. नागपूर शहरामध्ये १६ जुलैपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत डेंग्यू संशयीत किंवा बाधित रुग्णाच्या घरी भेट देणे, रुग्णाच्या नातेवाईकांचे रक्तनमुने घेणे व परिसरातील २०० घरांचे सर्वेक्षण करणे आदी कार्य सुरू आहे. १६ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये मनपाकडे नोंद झालेल्या दहाही झोनमधील संशयीत रुग्णांच्या घरी भेट देउन त्यांच्या संपर्कात येउ शकणा-या ९८००६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १०६४ तापाचे रुग्ण आढळले, २६४७ जणांचे रक्त नमुने तर १४९ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. सर्वेक्षणात ९२९ दुषित घरे आढळून आली, ३८३४० कूलर्सची तपासणी केली असता ५४०८ कूलर्समध्ये डासअळी आढळून आली. त्याबाबत कार्यवाही करण्यात आली. १ ते २५ ऑगस्ट दरम्यान १७६२७१ घरांची तपासणी करण्यात आली यापैकी ६०३४४ दुषित घरे आढळली. यामध्ये २०१६ तापाचे रुग्ण आढळले, ३४६२ जणांचे रक्त नमुने तर ७०२ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. ३४१९४ कूलर्स तपासणी केली असता २८९९ दुषित आढळले. एकूणच घराघरांमध्ये जाउन मनपाच्या आरोग्य कर्मचा-यांमार्फत जनजागृतीसह उपाययोजना करण्यात येत असल्याचे दीपाली नासरे यांनी सांगितले.

डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी ते नगरसेवकांकडे फवारणीकरिता तक्रार करतात. एकीकडे मनपाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहेच. मात्र रुग्णसंख्या कमी व्हावी यादृष्टीने डास प्रतिबंधक धुरफवारणी अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वत्र वेळेमध्ये धुरफवारणी व्हावी यादृष्टीने नियोजन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने झोनमधील प्रत्येक प्रभात एक फवारणी कर्मचारी उपलब्ध आहेत. या कर्मचा-यांच्या माध्यमातून संपूर्ण झोनचे कर्मचारी लावून प्रभागनिहाय फवारणी सुरू केल्यास लवकरच सर्व भागामध्ये फवारणी होउ शकेल व कर्मचा-यांच्या कामावरही नियंत्रण राहिल, असे आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन म्हणाले.

कोरोनाची सद्यपरिस्थितीत व संभाव्य धोक्याबद्दलची तयारी याबद्दलही समितीमध्ये आढावा घेण्यात आला. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात शहरातील दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दहाच्या आत आहे. दररोज चार ते पाच हजार चाचण्याही होत आहेत याशिवाय ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा शंभरच्या आत आहेत. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पॉझिटिव्ह येणा-या रुग्णांना आमदार निवास येथे संस्थात्मक विलगीकरणात किंवा गरज असल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येते. लसीकरणावर भर देण्यात येत असून आतापर्यंत शहरातील साडेअकरा लाख लोकांनी पहिला तर पाच लाख लोकांनी दुसरा डोज घेतला आहे. झोपडपट्टी भागातील नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाचे झोनस्तरावर पथक असून ते ‘हाउस टू हाउस’ सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्यांचे लसीकरण करणार आहेत. संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे हे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले. दुस-या लाटेप्रमाणे ऑक्सिजन किंवा औषधांचा तुटवडा निर्माण होउ नये यासाठी प्रशासनाद्वारे आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.

कोव्हिड सेवेनंतर आता मनपाच्या दवाखान्यांमध्ये नियमित सेवा सुरू होत आहेत. पाचपावली सूतीकागृह येथे गरोदर महिलांची प्रसुती सुरू करण्यात आली आहे. मनपाच्या सूतीकागृहांमध्ये सिझेरियन प्रसुती करिता आवश्यकता भासल्यास बाहेरून तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ बोलावण्यात येतात. या तज्ज्ञांचे शुल्क रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावे लागायचे मात्र आता हे शुल्कही मनपा एनयूएचए मधून देणार असल्याने रुग्णांना कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही. यानंतरही मनपाच्या कुठल्याही दवाखान्यात प्रसुतीकरिता पैशांची मागणी करण्यात आल्यास त्याची माहिती प्रशासनाकडे देण्याचे आवाहन यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली. मनपा रुग्णालयामध्ये नियुक्त डॉक्टर कर्तव्याच्या वेळेत हजर राहत नसल्याची तक्रार आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी उपस्थित केली. पाचपावली रुग्णालयामध्ये आपण भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. असे प्रकार इतरही रुग्णालयांमध्ये घडत असल्यास ते योग्य नसल्याचेही ते म्हणाले. मनपाद्वारे नियुक्त डॉक्टरांनी त्यांच्या कामाच्या वेळेमध्ये रुग्णालयामध्ये हजर राहणे बंधनकारक आहे. अशात वेळेत हजर न राहणा-या डॉक्टर्सवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी डॉ.संजय चिलकर यांनी दिला.

Advertisement