Published On : Sun, Sep 12th, 2021
By Nagpur Today Nagpur News

रस्ते अपघातांची स्थिती नागपुरात चिंताजनक : ना. नितीन गडकरी

Advertisement

‘इंटेलिजंट सोल्युशन फॉर रोड सेफ्टी’ चर्चासत्र

नागपूर: रस्ते अपघातांची स्थिती नागपुरात चिंताजनक असून अपघात झाल्यानंतर मनपा, नासुप्र व वाहतूक पोलिस विभाग अपघात का झाला याचा अभ्यास करीत नाहीत आणि उपाययोजनाही केल्या जात नाही. या तीनही विभागात सहकार्य, समन्वय आणि संवाद दिसत नसल्याची नाराजी केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘इंटेलिजंट सोल्युशन फॉर रोड सेफ्टी’ या विषयावरील एका संवादात हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे ना. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला मनपाचे अप्पर आयुक्त मीना, सतीशचंद्रा, निवृत्ती राय, डॉ. विकास महात्मे, प्रो. नारायण आदी मान्यवर उपस्थित होते. जगात रस्ते बांधकामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नुकतेच बांधकामात प्राधिकरणाने 3 जागतिक विक्रम केले आहेत. 38 किमी प्रतिदिन याप्रमाणे आमचे रस्ते, महामार्ग बांधण्याची गती आहे. नुकतीच आम्ही ‘रोड कम एअरस्ट्रीप’ राजस्थानात तयार केली असून नुकतेच त्याचे उद्घाटन झाले. अशा आणखी 20 एअरस्ट्रीप बनवीत आहोत. रस्त्यांच्या शेजारी 450 हेलिपॅड तयार करीत आहोत. अपघातामुळे निर्माण झालेल्या आणिबाणीच्या स्थितीत हे हेलिपॅड जीव वाचविण्यासाठी मदत करतील.

अपघात होऊच नयेत असे प्रयत्न हवेत. अपघात झाल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी त्याचा अभ्यास, उपाययोजना करण्यासाठी कोणताही पुढाकार घेत नाहीत. आमची यंत्रणा ही अधिक संवेदनशील बनावी व लोकांचा जीव वाचविण्यासाठी अधिक सहयोग द्यावा लागणार आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- वायू, जल आणि ध्वनिप्रदूषणमुक्त शहर असावे. वाहनांचे हॉर्न हे कानाला गोड वाटतील अशा आवाजातील पाहिजेत. भारतीय संगीतातील वाद्यांचे आवाज हॉर्नला असावेत, असेही ते म्हणाले.

रस्ते अपघातासाठी रस्त्यावर होणार्‍या कारचे पार्किंग हे एक कारण असते. रस्त्यावर पार्किंग केलेल्या कारचे फोटो काढण्याचे काम जनआक्रोशसारख्या स्वयंसेवी संस्थांना दिले गेले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले- देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात व 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. यापैकी 70 टक्के मृत हे 18 ते 40 वयोगटातील तरुण असल्याचे समोर आले आहे. येत्या 2025 पर्यंत आपण अपघातांमध्ये 50 टक्के घट होईल असे प्रयत्न करीत असून 2030 पर्यंत शून्य अपघात व्हावे असे आमचे लक्ष्य आहे. प्रभावी व यशस्वी तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही अपघात कमी करू असेही ते म्हणाले.
नागपुरात 1500 अपघातात 250 जणांचा मृत्यू होतो, असे सांगून ते म्हणाले- वाहन सुरक्षा पैलू ठरविताना व्हीएनआयटीची मदत घेतली जावी. ड्रायव्हर वॉर्निंग सिस्टमही अपघात कमी करण्यास मदत करते, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

Advertisement