कर्जत- जामखेड मतदारसंघातील आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार फायदा आणि क्लस्टरचा होणार विकास
नागपूर : कर्जत-जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार नेहमीच कार्यरत आहेत. मतदारसंघातील नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी केंद्र, राज्य पातळीवर तत्परतेने पाठपुरावा करून ते प्रगतीचा नवा आयाम स्थापित करत आहेतच शिवाय मतदारसंघातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात निर्माण आणि नुतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेत आहेत.
केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंग यांची आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता. १४) भेट घेऊन मंत्रीपद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणचे जवळपास १० हजार लाभार्थी आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांच्या घरांचे हप्ते बाकी आहेत, काही नागरिकांची नाव ही ‘ड’- यादीमध्ये येऊनसुद्धा त्यांची नावे काही कारणांनी वगळण्यात आली आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी राबविण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून अशा अनेक अडचणी कर्जत-जामखेड मतदारसंघात असल्याचे निदर्शनास आले. या सर्व समस्या समजून घेऊन याविषयी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी हि समस्या केवळ कर्जत-जामखेड मतदारसंघापुरती मर्यादित नसून सर्व राज्याला या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे कळाले. मनरेगामध्ये राज्यात प्रधानमंत्री आवास योजना/ राज्य योजनेच्या ५२.६% घरांची कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना /राज्य योजनेतील घरकामासाठी घरांच्या हप्त्यानुसार टप्प्याटप्प्याने मस्टर जारी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मस्टरची काही रक्कम थकीत आहे.
अशा प्रलंबित घरांच्या मस्टरसाठी मुदतवाढ द्यावी. प्रधानमंत्री आवास योजना, आवास प्लस अंतर्गत लाभार्थी अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यात आवास यादीतून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत, हे निकष शिथिल करावे, श्रेण्यांसाठी लक्ष्य वाढविणे, घराची किंमत २ लाख रुपये पर्यंत वाढवणे, काही पात्र कुटुंबांना चुकीच्या माहिती अपलोड केल्यामुळे सिस्टममधून वगळण्यात आले आहे यासाठी माहिती संपादनाची अद्ययावत सुविधा प्रदान करावी आणि विविध तांत्रिक समस्यांमुळे अनेकजण नोंदणी करू शकले नाहीत. अशा पात्र लाभार्थ्यांसाठी नोंदणी विंडो आणखी १५ दिवसांसाठी पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात यावी आणि महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांचा विचार करावा ही विनंती आमदार रोहित पवार यांनी गिरीराज सिंग यांना केली.
सोबतच श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील काही क्लस्टर विकसित केले जावेत यासाठी आ. रोहित पवार प्रयत्नशील राहून कार्य करत आहेत. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. येथील ग्रामीण लोकसंख्येची वाढ गेल्या जनगणनेच्या तुलनेत मोठी आहे आणि अधिकाधिक लोक अकृषिक व्यवसायाकडे वाटचाल करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी मूलभूत लोकसंख्या निकषात पात्र असलेली जामखेड तालुक्यातील खर्डा आणि नानस -जवला, आणि कर्जतमधील राशीन आणि कुलधरण एसपीएमआरएमच्या नेतृत्वाखाली विकसित करण्याची मागणी निवेदनाद्वारे गिरीराज सिंग यांना केली. कर्जत- जामखेड मतदारसंघातील हे क्लस्टर श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत अधिक चांगल्या गावांमध्ये विकसित होऊ शकतील आणि यामुळे सामुदायिक विकासाचे महत्त्व अधोरेखित होऊ शकेल असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
कर्जत- जामखेडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत आणि एसपीएमआरएमच्या अंतर्गत क्लस्टरला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी गिरीराज सिंग यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये असता केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेऊन मतदारसंघातील विषयांवर चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना भेटून मतदारसंघातील बँकांच्या अडचणी आणि शाखांची संख्या वाढविण्याबाबत चर्चा केली.