Published On : Sat, Sep 18th, 2021
By Nagpur Today Nagpur News

महापौर दंत तपासणी शिबिराचा शुभारंभ

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने महापौर दंत तपासणी शिबिराचा शनिवारी (ता.१८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. ‘आझादी-७५’ अंतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने संपूर्ण शहरामध्य ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार असून गांधीबाग झोन अंतर्गत दंत तपासणी शिबिराच्या माध्यमातून त्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड.संजय बालपांडे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. वैभव यांच्यासह त्यांची संपूर्ण चमू उपस्थित होते.

Today’s Rate
Saturday 23 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य सुविधेकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने विविध भागामध्ये, परिसरात वेगवेगळी आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागाच्या वतीने शहरात डिसेंबर पर्यंत १०७ प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे व त्यादृष्टीने शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. अंधत्व निवारणाच्या दृष्टीने महापौर नेत्रज्योती योजनेंतर्गत कॅटरेगची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येत आहे. महापौर नेत्रज्योती योजनेंतर्गत महात्मे नेत्रपेढी येथे आतापर्यंत ७५० शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून महात्मे नेत्रपेढी येथे रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाते शिवाय लेन्स व आवश्यक चष्मा सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे. याच श्रृंखलेमध्ये आता दंत तपासणी शिबिराचे आयोजन होत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. अभय दातारकर यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘आझादी-७५’ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात महाविद्यालयाच्या सहार्याने ७५ दंत तपासणी शिबिर आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. दातारकर यांनी त्वरीत या संकल्पनेला होकार दर्शवित त्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली, असे सांगतानाच पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच सामाजिक कार्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी डॉ. दातारकरांचे विशेष अभिनंदनही केले.

शिबिरामध्ये दातांची स्वच्छता, दातांमध्ये फिलिंग करणे, दात काढणे, खर्रा खाणा-यांना असलेल्या कॅन्सरच्या धोक्याबाबत तपासणीद्वारे योग्य माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचाराबाबतही शिबिरामध्ये तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये केले जाईल. यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये जास्तीत नागरिकांनी सहभागी होउन आवश्यक ती दंत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

Advertisement