जिल्ह्यात 8 ते 14ऑक्टोबर ‘कवचकुंडल’ लसीकरण मोहिम
जी ओ-एनजीओ प्लॅटफार्मद्वारे ग्रामस्तरावर लसीकरणास चालना
नागपूर, : शासनाच्या हाताला बळ देण्यासाठी स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने तालुका व ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण करा व लसीकरणाचे उद्दिष्टय पूर्ण करण्यास गती द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे जिल्हा टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अमित टंडन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी प्रामुख्याने उपस्थित होते तर आभासी प्रणालीद्वारे अल्पना बोसे व डॉ.संजय माने चर्चेत सहभागी झाले.
जिल्ह्यात पहिल्या डोसचे 74 टक्के लसीकरण झाले आहे. परंतु त्यामानाने दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने जनजागृती करुन लसीकरणाच्या मोहिमेस गती द्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नागरिकांचा कोरोना लसीकरणाबाबत जो गैरसमज आहे. त्यासाठी जनजागृती करुन ग्रामीण भागात घरोघरी जावून लसीकरण करा. या कामात माविमच्या महिला स्वयंसहाय्यता गट, आत्मा व कृषी गटाची मदत घ्या, असे त्यांनी सांगितले. लसीकरणामुळे प्रतिकार शक्ती वाढून रोगास प्रतिबंध करण्याची शक्ती निर्माण होते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण व सुरक्षिततेच्या दृष्टीने लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लॉयन्स क्लबने 7 हजाराचे लसीकरण उद्दिष्ट्य पार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
आरोग्य यंत्रणेचे या कामास प्राधान्य देवून लसीकरण करावे व संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सक्षम राहावे. गरोदर स्त्रिया व वृध्द यांना लसीकरण व्हॅनद्वारे लसीकरण केंद्रात आणावे. महिला लसीकरणास मागील महिन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्याच प्रकारे 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या कवचकुंडल लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण करुनच दुसऱ्या डोसचे लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रारंभी अमित टंडन यांनी सादरीकरणाद्वारे जीओ-एनजीओ प्लॅटफार्म बाबत माहिती दिली.
प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी कवचकुंडल लसीकरणाबाबत माहिती देताना लसीकरणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असे सांगितले. झाल्यास त्याचा परिणाम होणार नाही. दुसऱ्या डोससाठी युध्दपातळीवर काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कमी लसीकरण झालेल्या गावावर आरोग्य यंत्रणेने फोकस ठेवून घरोघरी जावून लसीकरण करावे. त्यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कामात ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधीची मदत घेण्यात यावी. तालुकास्तरावर बैठक घेवून लसीकरणाचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीस जिल्हयातील स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.