मनपा आयुक्तांचे निर्देश : ‘मिशन कवच कुंडल’ संदर्भात टास्क फोर्स समितीची बैठक
नागपूर : नियमांच्या अधिन राहून नागपूर शहरातील धार्मिक स्थळे, मॉल आदी सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी या स्थळांमध्ये लसीकरणाचे दोन डोज घेतलेल्यांनाच प्रवेश देणे अनिवार्य आहे. कुठलाही धार्मिक कार्यक्रम घेणारी आयोजन समिती, मॉलचे व्यवस्थापन प्रशासन यांनी याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मनपातर्फे धार्मिक स्थळे व मॉलची तपासणी सुरू असून तिथे लसीकरणाचे दोन डोज न घेतलेल्यांना प्रवेश देण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित स्थळ सील करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान नागपूर शहरामध्ये ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात शनिवारी (ता.९) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूम मध्ये टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डब्ल्यूएचओ चे प्रतिनिधी राजिद खान, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनल आरोग्य अधिकारी, शहरातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नागपूर शहरात १६ जानेवारी २०२१ पासून कोव्हिड लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. आतापर्यंत शहरातील ७४ टक्के नागरिकांचे पहिल्या डोजचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर ३७ टक्के नागरिकांनी दोन्ही डोज पूर्ण केले आहे. मात्र अद्यापही शहरातील सुमारे ५ लाख पात्र व्यक्तींनी अजूनपर्यंत लसीकरणाचा पहिला डोजही घेतला नाही. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत लसीकरण न झालेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्याचे कार्य मनपातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रभागांमध्ये सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
कोव्हिड संसर्गाचा धोका टाळता यावा यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीकरणासाठी शहरातील १५५ केंद्रांवर मानपाद्वारे व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. नियमांच्या अधिन राहून नागपूर शहरातील मॉल, धार्मिक स्थळे सुरू करण्यात आहेत. या ठिकाणांहून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यादृष्टीने संबंधित व्यवस्थापनाने काळजी घेणे आवश्यक आहे. येत्या १५ ऑक्टोबरला दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार असून येथेही लसीकरणाचे दोन डोज पूर्ण करणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.