राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष यांची आदिवासी प्रकल्प कार्यालयाला भेट
गडचिरोली (जिमाका): राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान यांनी प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे भेट देवून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी गडचिरोलीतील विविध आदिवासी भागात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
जिल्हयातील योजनांची अंमलबजावणी करत असताना येणाऱ्या विविध अडचणींबाबतही सादरीकरण प्रकल्प कार्यालयाकडून जिल्हाधिकारी संजय मीणा व प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांनी सादर केले. यावेळी आरोग्य विषयक सुविधांची एक चांगली व्यवस्था कशी असावी याबाबत त्यांनी संशोधन करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच गडचिरोली जिल्हयात आरोग्य सुविधांबाबत एक अभ्यासपूर्ण प्रयोग सुरू करता येईल असे ते यावेळी म्हणाले.
हर्ष चौहान यांनी जिल्ह्याला मिळणाऱ्या पेसा या घटकावर येणारे पैशांचा विनियोग योग्य प्रकारे करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच किसान क्रेडिट कार्डबाबत बँकांना आवश्यक सूचना देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, भामरागडचे उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, अहेरीचे उपविभागीय अधिकारी श्री. अंकित तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.