नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपचे नागपूर विभागातील उमेदवार आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी गडकरी यांनी बावनकुळे यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी गडकरींच्या निवासस्थानी कांचन गडकरी यांनी बावनकुळे यांचे औक्षण केले.
आकाशवाणी चौकातून बावनकुळेंसह कार्यकर्त्यांची रॅली निघाली, यात गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे शक्ती प्रदर्शन केले. बावनकुळे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, च्या घोषणेसह अनेक कार्यकर्त्यांचा जत्था बावनकुळेंसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला.
जबाबादरी निश्चित पार पाडू – बावनकुळे
विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, मला महाराष्ट्र विधानपरिषदेत विदर्भाची आणि महाराष्ट्राची काम करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडेल आणि ही निवडणूक आम्ही निश्चित जिंकू असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक घोषित करण्यात आली आहे. एकूण ५ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यामधील २ जागा या मुंबईत आहेत. मराठवाडा, विदर्भातील जागा आहेत. या जागांवर १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल प्रक्रिया १४ डिसेंबरला लागणार आहे.