– अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या सूचना
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सद्यस्थितीत ९४ टक्के नागरिकांनी कोविड-१९ची पहिली लस घेतली. उर्वरीत ६ टक्के नागरिकांचे लसीकरण येत्या १० दिवसात पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले.
९ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त विद्या पाटील, प्र-सहायक आयुक्त सचिन माकोडे, प्र-सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, मनपाच्या शहरातील सर्व सातही शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहरातील एकूण लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील २ लाख ५१ हजार ७०० हजार व्यक्ती कोविड-१९ लसीकरणासाठी पात्र आहेत. यातील ९४ टक्के नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली. लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी मनपाने विविध उपक्रम राबिविले. त्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या २० डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करा, अशा सूचना मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्या.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात विना मास्क फिरणाऱ्या वाहनधारक आणि नागरिकांवरही कारवाई करा, त्यांनी लसीकरण केले नसल्यास त्यांची चाचणी करा किंवा त्यांना लसीकरणास प्रवृत्त करा, अशा सूचनादेखील देण्यात आल्या.