Published On : Sun, Dec 26th, 2021
By Nagpur Today Nagpur News

शहरात मनपाचे नि:शुल्क बेघर निवारा केंद्र २४ तास सेवारत

Advertisement

विविध ठिकाणच्या ६ केंद्रामध्ये १७२ बेघरांना निवारा

नागपूर: नागपूर शहरात फुटपाथ, रस्त्यालगत व अन्य ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या बेघरांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागांतर्गत शहरातील विविध ठिकाणी सहा शहरी बेघर निवारा केंद्र सेवारत आहेत. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्व बेघर निवारा केंद्रांमध्ये २४ तास सेवा असून येथे निवासासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही. शहरात थंडी वाढत असल्यामुळे शहरातील बेघरांनी आपल्या जवळच्या निवारा केंद्राचा लाभ घ्यावा, या कार्यात शहरातील नागरिकांनीही मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना आणि उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत समाजविकास विभागाद्वारे शहरातील बेघर नागरिकांसाठी सहा निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांचे पाच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून संचालन केले जात आहे. या निवारा केंद्रात २८० बेड्सची व्यवस्था असून यात सद्यस्थितीत १७२ नागरिक निवारा केंद्राचा लाभ घेत आहेत. मनपाच्या बेघर निवारा केंद्रात बेघर नागरिकांना मोफत राहण्याची सुविधा आहे. यामध्ये रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा राहण्याची मोफत व्यवस्था आहे. येथे राहणाऱ्या ६० वर्षावरील नागरिकांना मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ६० वर्षाखाली नागरिकांसाठी अल्प दरात अल्पोपहार व भोजनाची सुविधा देण्यात येते.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरात फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना जवळच्या बेघर निवारा केंद्रात आणले जाते. यासाठी सामाजिक संस्थेमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात अली असून या कामासाठी नागपूर पोलिसांचीसुद्धा मदत घेण्यात येते. डिसेंबर महिन्यात अचानक थंडी वाढल्याने मागील १५ दिवसात फूटपाथवर राहणाऱ्या ४० बेघर नागरिकांची मनपाच्या निवारा केंद्रात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. शहरातील ज्या भागांमध्ये बेघर असतील त्यांची माहिती मनपाला देऊन त्यांना निवारा केंद्राचा लाभ मिळवून देण्यात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

नागपूर शहरात आसरा शहरी बेघर निवारा, बुटी कन्या शाळा, बुटी दवाखान्याजवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, (9960183143), सावली शहरी बेघर निवारा, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा, टिमकी, भानखेडा (9049752690), सहारा शहरी बेघर निवारा बुटी गणेश टेकडी उड्डाण पुलाखाली, रेल्वे स्टेशन रोड (9595915401), आश्रय शहरी बेघर निवारा, संत गुरु घासीदास समाज भवन, साखरकारवाडी, डिप्टी सिग्नल (7498466691), बोधिसत्व शहरी बेघर निवारा, मिशन मोहल्ला, इंदोरा (9975934267), आपुलकी शहरी बेघर निवारा, इंदोरा समाज भवन परिसर मिशन मोहल्ला, नवीन इमारत (8329213219) असे सहा ठिकाणी बेघरांसाठी सर्व आवश्यक सोयी सुविधायुक्त २४ तास निवास व्यवस्था असलेले शहरी बेघर निवारे असून त्याचा बेघर नागरीकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना व उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी केले आहे.

शहरी बेघर निवारा केंद्र व संचालन करणाऱ्या संस्था

Advertisement
Advertisement