नागपूर : नागपूर शहरात कचरा संकलन करणाऱ्या एव्हीजी आणि बिव्हीजी कंपनीच्या कामात होत असलेली अनियमितता तपासण्यासाठी सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. चौकशी समितीतर्फे गुरुवारी (ता. ६) चौकशी अहवाल बंद लखोट्यात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सादर करण्यात आला.
यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, सदस्य सर्वश्री वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती महेश (संजय) महाजन, नितीन साठवणे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ.गजेन्द्र महल्ले उपस्थित होते.
हा अहवाल पुढील सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मनपाच्या २८ मे २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांनी एव्हीजी व बिव्हीजी कंपनीच्या कामात होत असलेल्या अनियमिततेमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात स्थगन प्रस्ताव सादर केला होता.
या स्थगन प्रस्तावावर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. चौकशी समितीद्वारे एव्हीजी व बिव्हीजी या दोन्ही कंपनीच्या कामाबद्दल चर्चा करून कामात काही त्रुटी आढळल्यास नियमाप्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात आली.