हनुमाननगर आणि नेहरूनगर झोन अंतर्गत रस्त्यांच्या कामाची केली पाहणी
नागपूर : कोरोना काळात हनुमाननगर झोन आणि नेहरूनगर झोन अंतर्गत टप्पा २ आणि टप्पा ३ मधील सुरू असलेले सिमेंट रस्त्यांचे काम बंद करण्यात आले. अद्यापही हे काम पूर्ण झालेले नसल्याने येथील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सोबतच स्थानिक व्यावसायिकांना सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी झोनच्या अभियंत्यांना दिले. गुरुवारी (ता.२७) स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी हनुमाननगर आणि नेहरूनगर झोन अंतर्गत अपूर्ण असलेल्या सिमेंट रस्त्यांची पाहणी केली.
यावेळी समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्यासह मुख्य अभियंता प्रदीप खवले, झोनचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी याबद्दल झोन कार्यालयात तक्रारी केल्या. प्राप्त तक्रारीनुसार सभापतींनी गुरुवारी रस्त्यांची पहाणी केली.
शिल्लक असलेली सर्व कामे लवकरात लवकर कंत्राटदाराकडून पूर्ण करून घ्यावे. तसेच पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामाची माहिती समितीसमोर सादर करावी. ज्या कंत्राटदाराचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण केल्याशिवाय मनपातील इतर कामे सदर कंत्राटदाराला सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश यावेळी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी मनपाच्या मुख्य अभियंता यांना दिले.