नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ७ भावी डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत गोंदियाचे भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा २५ वर्षीय मुलगा अविष्कारचेही निधन झाले. आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील व प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विजयजी रहांगडाले यांच्या गोंदियातील खमारी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या भेटीत रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या. आपला २५ वर्षांचा तरुण मुलगा अपघातात गमावल्याने दु:खाचा डोंगर कुटुंबीयांवर कोसळला आहे. त्यातच, वडिल विजय यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. त्यांची ही पोस्ट वाचून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. त्यातच, आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देताच, आ विजय यांना पुन्हा अश्रू अनावर झाले. या भावनिक आणि दु:खीप्रसंगी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
वर्धा येथील अपघाताची घटना दुःखदायी आहे. रहांगडाले परिवारासोबतचे संबंध घरगुती असून, त्यांच्या कुटुबियांना भेट देण्यासाठी आलो. रहांगडाले कुटुबीयांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो, अशा शब्दात यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रीकांतजी भारतीय, भाजपा प्रदेश महामंत्री, संघटन महामंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर व आमदार डॉ. परिणयजी फुके उपस्थित होते.