नागपूर: गानसम्राज्ञी व देशाची शान असलेल्या लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. लतादीदी देशाचा अभिमान आहे. त्यांच्या निधनामुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले असून संगीत साधकांसाठी त्या सदैव प्रेरणास्थान होत्या, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
जोपर्यंत जग आहे, तोपर्यंत त्यांना कुणी विसरणार नाही. एक चैतन्यमयी सूर काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना व्यक्त करतानाच ना. गडकरी म्हणाले- लतादीदी प्रखर देशभक्त होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराधारेवर त्यांची दृढ श्रध्दा होती. उत्तम कार्यासाठी लतादीदींनी नेहमीच आम्हाला प्रेरणा दिली. भारतीय संगीतात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. 30 हजारापेक्षा अधिक गाणे गावून त्यांनी भारतीय संगीतक्षेत्राला विश्वात शिखरावर पोहोचवले. मलाही त्यांच्या आवाजातील गाणे प्रिय आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.