नागपूर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष डोळ्यासमोर ठेवून आगामी २५ वर्षांच्या विकासाचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. सामान्यांच्या गरजा भागवणारा, सर्व क्षेत्राला स्पर्श करणारा आणि न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे यांनी केले. शनिवारी (ता. १२ फेब्रुवारी) ते एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रपरिषदेला प्रामुख्याने माजी ऊर्जा मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह प्रदेश माध्यम प्रमुख विश्वासजी पाठक, महापौर श्री दयाशंकरजी तिवारी, प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे, खा. विकासजी महात्मे, आ. प्रवीणजी दटके, आ. गिरीशजी व्यास, आ. मोहनजी मते, आ. अनिलजी सोले, आ. विकासजी कुंभारे, माजी आमदार श्री मल्लिकार्जूनजी रेड्डी, अर्चनाताई डेहनकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रावसाहेब दानवे म्हणाले, २०१४ साली असलेला १८ लाख कोटींचा भारतीय अर्थसंकल्प आज ३९ लाख कोटींचा झाला, १४४ लाख कोटींचा विकासदर आता २१० कोटींचा झाला, प्रत्यक्ष कर २०१४ पासून अजिबात वाढलेला नाही, यापूर्वी २३ टक्क्यांच्या घरात असलेला अप्रत्यक्ष कर आता १८ टक्क्यावर आला आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या स्थानावर होती, ती आज पाचव्या स्थानावर आली असून, भारताची अर्थव्यवथा ३ ट्रिलियनवरून ५ ट्रिलियनपर्यंत नेण्याचा संकल्प मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे.
भारतीय अर्थसंकल्पात पूर्वी कृषी क्षेत्रासाठी केवळ ३१ हजार कोटींची तरतूद होती ती आता एक लाख ३२ हजार कोटींवर पोहोचली आहे. वेगाने खराब होणाऱ्या कृषी उत्पादनांसाठी केंद्र सरकारने किसान रेल प्रारंभ केली. आजपर्यंत किसान रेलच्या १९०० फेऱ्या झाल्या असून, शेतकऱ्यांना ५० टक्के सबसीडी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर रस्ते, सुरक्षा, रेल्वे, स्टेशन डेव्हलपमेंट, हर घर मे नल और जल अशा विविध योजनांना बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. इतके सगळे केवळ नरेंद्रजी मोदींच्याच नेतृत्वात शक्य होऊ शकते असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान म्हणून देशाला नरेंद्रजी मोदी लाभले नसते तर भारतीयांच्या लघू उद्योगाला बळ मिळाले नसते, पक्क्या छताचे घरं, मोफत सौचालय, मोफत वीज कनेक्शन, १०० रुपयात गॅस कनेक्शनच्या योजना अमलांत आल्या नसत्या, असे सांगताना गॅस कनेक्शन योजनेतूनत तब्बल साडे आठ कोटी धारकांना फायदा झाल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाला जागतिक मान्यता लाभली असून, यापूर्वीच्या सरकारने कधीही केला नाही इतका खर्च नरेंद्रजी मोदी यांनी पायाभूत सुविधांवर केला असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये शिजलेलं अन्न
देशात धावणाऱ्या लांबपल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधे प्रवाशांना पॅक फूड दिले जायचे. पुढील आठवड्यापासून शिजलेलं अन्न देण्यात येणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.
सात रेल्वे प्रकल्पांचा विकास आराखडा
मा. प्रधानमंत्र्यांनी देशातील ७ रेल्वे प्रकल्पांचा विकास आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. यात वाराणसी-दिल्ली, अहमदाबाद-दिल्ली, यासह मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा देखील समावेश असून, हा आराखडा फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
काँग्रेसचे आंदोलन
भाजपा नेत्यांच्या घरासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तो संपलेले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न होता असे यावेळी रावसाहेब दानावे म्हणाले.
अर्थसंकल्पात विदर्भासाठीची तरतूद
– वर्धा नांदेड महामार्गासाठी २८४ कोटींचा निधी
– वर्धा बल्लारशाह तिहेरीकरणाला १३०० कोटींचा निधी
– वर्धा नागपूर तिहेरीकरणाला ६०० कोटींचा निधी
– नागपूर नागभीड ११६ किमी रस्त्याला १४०० कोटींचा निधी
– नागपूर आणि अजनी स्टेशनचा विकास