स्व. सिध्दार्थ गुप्ता स्मृती कॅन्सर ब्लॉकचे उद्घाटन
नागपूर: वैद्यकीय सुविधा आता सार्वजनिक खाजगी सहभागातून उभ्या राहाव्यात. तसेच वैद्यकीय क्षेत्रासह पायाभूत सुविधा निर्माण करणार्या क्षेत्रातही संशोधनाला प्राधान्य देण्यात यावे. नवीन संशोधन हेच आपले भविष्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे दत्ता मेघे यांच्या पुढाकाराने स्व. सिध्दार्थ गुप्ता स्मृती कॅन्सर ब्लॉकचे उद्घाटन आज ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी खा. दत्ता मेघे, पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु वेदप्रकाश मित्रा, आ. समीर मेघे, सागर मेघे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले- आज गरीब माणसाला हॉस्पिटलमध्ये जाणे कठीण झाले आहे. हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च तो भरू शकत नाही. यासाठी सार्वजनिक खाजगी सहभागातून हॉस्पिटल्स निर्माण व्हावेत आणि गरिबांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागात असे वैद्यकीय प्रकल्प उभे राहणे ही आता आपली गरज झाली आहे.
कोविडच्या काळात ऑक्सीजन व व्हेंटिलेटरची एवढी कमी होती की अनेकांना प्राण गमवावे लागले. या काळातच मेघे कुटुंबियांनी आपल्या रुग्णालयांमध्ये गरीबांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले. स्व. सिध्दार्थ गुप्ता हे आ. समीर मेघेंचे मित्र होते. मित्राच्या स्मृतिनिमित्त हा उपक्रम सुरु करून समीरने सामाजिक जबाबदारीची जाण करून दिली. अत्याधुनिक व पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारमध्ये मर्यादा आहेत. त्यासाठी सार्वजनिक खाजगी सहभागातून या सुविधा उपलब्ध कराव्याच लागणार आहेत, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कर्करोग होऊच नये, तो टाळता कसा येईल, यावरही खूप काम करावे लागणार आहे. कर्करोग रुग्णालयांनी यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे अन्य क्षेत्रांमध्येही आपल्याला संशोधनावर अधिक भर द्यावा लागणार आहे. कारण आपल्यात तशा क्षमता आहेत. नवनवीन संशोधन करून, तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबांचे जीवन अधिक सुखकर कसे करता येईल, यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही प्रयत्न करावेत, असेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.