महाल परिसरात महापौरांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीचा महत्वपूर्ण पुढाकार
नागपूर: नागपूर शहराला मोठा इतिहास लाभला आहे. भोसले राजांचा महाल हा त्या सर्व ऐतिहासिक गोष्टींचे कारण आहे. महाल परिसरात आज मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात मात्र खरेदीला येताना या भागात दिसणा-या सर्व ऐतिहासिक बाबींची माहिती त्यांना होणे आवश्यक आहे. या बाबीची जनजागृती करण्यासाठी नागपूर शहराचा इतिहास आणि संस्कृती शहरातील प्रत्येक नागरिकासह नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने होत असलेले ‘हेरिटेज वॉक’ महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या स्ट्रीट फॉर पीपल अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकातर्फे गुरूवारी (ता.२४) नागरिकांना महाल येथील जुन्या ऐतिहासिक स्थळांची, हेरिटेज इमारतींची माहिती व्हावी या उद्देशाने हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत महापौर दयाशंकर तिवारी यांनी श्रीमंत राजे मुधोजी भोसले, युवराज जयसिंग भोसले, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्यासह परिसरात हेरिटेज इमारतींची पाहणी केली.
यावेळी उपमुख्य अधिकारी तथा गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, ई-गव्हर्नन्सचे डॉ. शील घुले, मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, नियोजन विभागाचे राहुल पांडे, स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर, नागपूर इतिहास अभ्यासक अथर्व शिवणकर, विधी अधिकारी मनजीत नेवारे, डॉ. पराग अरमल, दिव्या तडस, झोनल आरोग्य अधिकारी नरेश खरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. जगात चर्चिला जाणारा मारबत उत्सव, मस्क-या गणपती फक्त नागपूर शहरातच पहायला मिळतो. या सर्वांची सुरूवात राजे भोसलेंच्या काळातच झाली. इंग्रजांशी हातमिळवणी न करता त्यांच्याशी संघर्षाची भूमिका ठेवण्यामुळे भोसले महाल जाळण्याचाही प्रकार घडला. हा सर्व समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील हेरिटेज इमारतींचे जतन होणे आवश्यक आहे. सर्वांना पायी चालण्याचा अधिकार असून त्यातून महाल परिसरातही पायी चालण्यायोग्य सुविधा व्हावी यासाठी या भागात हा वारसा जसाचा तसा करून सुधारणा होणे आवश्यक आहे, असेही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.
हेरिटेज वॉक महाल येथील श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांचा मोठा राजवाडा (सीनियर भोसला पॅलेस) ते कल्याणेश्वर मंदिर पर्यंत करण्यात आले. श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांचा मोठा राजवाडा, पाताळेश्वर मंदिर, बाकाबाईचा वाडा, नागेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, कल्याणेश्वर मंदिर आदी हेरिटेज स्थळांना भेट देण्यात आली.
महाल परिसरात भेट देण्यात आलेल्या सर्व हेरिटेज इमारतींसंदर्भात नागपूर इतिहास अभ्यासह अथर्व शिवणकर यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.