लक्ष्मीनगर झोन कार्यालय इमारतीचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर : नागपूर शहरातील सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट झोन कार्यालयाची इमारत म्हणून लक्ष्मीनगर झोन कार्यालय इमारत नावारुपास आली आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र विविध कामांसाठी कार्यालयात येणा-या नागरिकांच्या कामात सुलभता आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांच्या आचरणातूनच इमारतीच्या सौंदर्याचे महत्व अधोरेखित होणार आहे, असे मत व्यक्त करताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांच्या कामांना प्राधान्य देतानाच सौहार्दपूर्वक आचरण ठेवण्याचा सल्लाही कर्मचा-यांना दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे सोमवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी महापौरांच्या हस्ते येथील नागरी सुविधा केंद्राचेही लोकार्पण करण्यात आले. झोन कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर अनिल सोले, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, विधी समिती सभापती मिनाक्षी तेलगोटे, माजी महापौर नंदा जिचकार, नगरसेवक सर्वश्री लहुकुमार बेहते, किशोर वानखेडे, लखन येरवार, नगरसेविका तारा (लक्ष्मी) यादव, नगरसेविका वनिता दांडेकर, सोनाली कडू, उज्ज्वला बनकर, प्रणिता शहाणे, लक्ष्मीनगर झोनचे माजी सभापती गोपाल बोहरे, मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी आदी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती असताना लक्ष्मीनगर झोनचे तत्कालीन सभापती गोपाल बोहरे यांच्यामार्फत झोन कार्यालयाच्या नवीन इमारतीसंदर्भात प्रस्ताव मांडला. याशिवाय या विषयाच्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवत असतानाच त्यावेळी मांडण्यात येणा-या अर्थसंकल्पापूर्वी या इमारतीसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावेळी घेतलेल्या पुढाकारामुळे या इमारतीला मूर्तरूप देण्याचे कार्य सुरू होउन पूर्णत्वास आल्याची आठवण यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितली. २०१४ साली भूमिपूजन झालेल्या सदर इमारतीच्या बांधकाम कार्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र येथील झोन सभापती म्हणून गोपाल बोहरे यांच्यापासून ते प्रकाश भोयर आणि पल्लवी शामकुळे यांनी विशेष लक्ष देत काम पूर्णत्वास नेल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सदर इमारतीच्या बांधकाम कार्याला सुरूवात झाली तेव्हा स्थायी समिती सभापती आणि लोकार्पण सोहळ्यात महापौर म्हणून उपस्थित राहणे ही आनंददायी बाब असल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.
माजी आमदार अनिल सोले यांनी मनपाच्या प्रशासनीक व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचे एक नवे सुरू होत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. नागपूर महानगरपालिकेचा कार्यभार केवळ मुख्यालयातूनच चालविला जात असताना राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वार्ड आफिसची रचना करण्यात आली. पुढे यामध्ये झोन सभापतीचा अंतर्भाव झाला. एकूणच स्थानिक स्तरावर नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी ही रचना झाली. अशात सभापती, अधिकारी, कर्मचारी यांना कार्य करण्यासाठी कार्यालय असावे व ते सुविधाजनक असावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. लक्ष्मीनगर झोन कार्यालयात असलेली अडचण लक्षात घेता नवीन इमारतीची संकल्पना पुढे आणून तत्कालीन सभापती गोपाल बोहरे यांनी पाठपुरावा केल्यानेच या इमारतीचे कार्य पूर्णत्वास आल्याचेही माजी आमदार अनिल सोले यांनी नमूद केले.
सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेंतर्गत प्रशासन आपल्या दारी यासंदर्भात भारतीय संविधानात तदतूद असून त्यानुसार वार्ड समिती व त्यानंतर मोहल्ला समिती गठीत करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार शहरात दहा झोनमध्ये दहा झोन कार्यालय स्थापन करून झोन सभापतींची नियुक्ती झाली. झोन समिती जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत मोहल्ला समिती गठीत करणे योग्य नसून झोन कार्यालयांमधून नागरिकांना जलद सुविधा मिळावी, प्रशासनीक सुलभता प्रदान व्हावी यादृष्टीने कार्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात झोन सभापती पल्लवी शामकुळे यांनी झोन इमारतीच्या बांधकामाची संकल्पना, त्यातील अडचणी, करण्यात आलेला पाठपुरावा आणि पूर्णत्वासाठी मिळालेली मदत या सर्व बाबींना स्पर्श केला. लक्ष्मीनगर येथे वाचनालयालगत सिमेंट पत्राच्या शेडमध्ये लोककर्म विभाग व सहायक आयुक्तांचे कार्यालय होते. इतर विभाग वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने ते एका इमारतीमध्ये आणण्याच्या दृष्टीने सुसज्ज इमारत व्हावी यासाठी तत्कालीन सभापती गोपाल बोहरे यांनी प्रयत्न केले. नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकार क्षेत्रातील जागा प्राप्त करण्यासाठीही वेगवेगळ्या स्तरावर मदत मिळाली. सर्व अडचणी, अडथळे पार करून इमारत नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू झाल्याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या.
लक्ष्मीनगर झोन कार्यालयाच्या इमारत पूर्णत्वासाठी योगदान देणारे महापौर दयाशंकर तिवारी यांचा सत्कार माजी आमदार अनिल सोले यांनी केला. तर महापौरांच्या हस्ते अनिल सोले, पल्लवी शामकुळे, गोपाल बोहरे, सहायक आयुक्त गणेश राठोड, आर्कीटेक्ट पराग दाते, सल्लागार मोहन केसरकर, अनिल बुटे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन गोविंद दावळे यांनी केले तर आभार सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी मानले.