नागपूर : नागपूर महानगरपालिका व अंतर्मना क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागर स्वातंत्र्याचा देशभक्ती गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी (ता.२) रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. स्पर्धेत सांघिक गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि वैयक्तिक गटात श्रद्धा यादव हे विजेते ठरले. महापौर दयाशंकर तिवारी आणि क्रीडा सांस्कृतिक सभापती प्रमोद तभाने यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी सुप्रसिध्द गीतकार जयंत इंदुरकर, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, क्रीडा सांस्कृतिक अधिकारी पीयूष आंबुलकर, अंतर्मना क्रिएशन्सचे कुणाल गडेकर, मकरंद भालेराव, सारंग मास्टे हे उपस्थित होते.
५ ते १५, आणि १५ ते इतर या वयोगटासह सांघिक गटात स्पर्धा घेण्यात आली. अंतिम फेरीत स्पर्धकांनी एकापेक्षाएक सरस गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सांघिक गटात प्रथम क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स, द्वितीय आर.एस.मुंडले, तृतीय आविष्कार कला अकादमी आणि उत्तेजनार्थ बक्षिस सेवासदन सक्षम सी.बी.एस.स्कूल ने पटकाविले. वैयक्तिक गटात प्रथम श्रद्धा यादव, द्वितीय प्रीत चुरे, तृतीय मोहम्मद जियाउद्दिन यासह उत्तेजनार्थ बक्षिस श्याम बापटे यांनी प्राप्त केले.
५ ते १५ वर्ष वयोगटात प्रथम ग्रांथिक खोब्रागडे, द्वितीय साईश देशपांडे, तृतीय सिद्धेश कुथे, उत्तेजनार्थ माधव मुळे, ध्रुव कुवरे विजयी ठरले. स्पर्धेत एकूण १६५ गायक कलावंतानी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी तीस स्पर्धकांची आणि सहा संघांची निवड करण्यात आली.
सांघिक गटातून प्रथम क्रमांकासाठी रोख ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये, तृतीय ५ हजार रुपये, उत्तेजनार्थ १ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. वैयक्तिक गटात प्रथम ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये, उत्तेजनार्थ १ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. ५ ते १५ वर्ष वयोगटात प्रथम ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये, तृतीय २ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ १ हजार रुपये बक्षिसे, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अमोल शेंडे यांनी केले. आभार कुणाल गडेकर यांनी मानले