जागतिक महिला दिन कार्यक्रम
नागपूर: करिअर करणाऱ्या महिलांनी आपला मातृत्वाचा अंश जपावा. स्त्रीला प्राप्त झालेली सृजनशक्ती हे निसर्गाने दिलेले वरदान आहे. उद्योजिकांनी मातृत्वाच्या या अंशाची जपणूक करावी. करिअर करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजीही तिने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका प्रमिलताई मेढे यांनी केले.
गायत्री महिला औद्यौगिक सहकारी संस्था, गायत्री महिला नागरी पतसंस्था, स्वयंपूर्ण बहुद्देशीय संस्था, स्वयंपूर्ण मन्युफाक्चरिंग ऑंनड रिसर्च असोसियेशन आणि आम्ही उद्योगिनी या संस्थांच्या वतीने महिला दिनानिमित्त संस्थेच्या वसतीगृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रमिलताई मेढे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावनाजी मानवत या होत्या. यावेळी प्रभावती एकुर्के आणि दिव्यांग खेळाडू कु. प्रतिमा बोंडे यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या प्रभावती एकुर्के यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन मुलींचे मतपरिवर्तन करून त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची नवी दिशा दिली. तसेच प्रतिमा बोंडे या दिव्यांग खेळाडूने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दहा सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सौ कांचनताई गडकरी यांनी केले, तर संचालन सौ स्नेहल दाते, वैयक्तिक गीत राखी जामदार तर आभार प्रदर्शन शीतल बनसोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सचिव श्रीमती विजयाताई भुसारी, नेहा लघाटे, अंजली मुळे, रेखा सप्तर्षी व अन्य पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.