मुंबई : करोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसुत्रावर आधारित अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत सादर केला.
यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली. यातून राज्यात भरीव गुंतवणूक होऊन राज्याचा जीडीपी एक लाख कोटी डाॅलर्सपर्यंत वाढेल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तुळापूर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटीची तरतूद सरकारने केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या ३४७८८ शेतकऱ्यांची ९६४ कोटीची कर्जमाफी करण्याची घोषणा आज पवार यांनी केली.