पांढरकवडा : महसूल विभागातील कारकून पदे त्वरित भरावीत या मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. या राज्यव्यापी संपामुळे दहा दिवसांपासून महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. पांढरकवडा तालुक्यासह राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संपाचा आज १० वा दिवस आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने दिनांक ४ एप्रिल पासून बेमुदत संप पुकारलेला आहे .संपात सर्व तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातील वर्ग-३ आणि वर्ग-४ चे कर्मचारी सहभागी आहे त्यामुळे तहसील व उपविभागीय कार्यालय मधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
महसूल आस्थापनेवर असणारे ४४ कर्मचारी हे संपावर गेले आहेत. गुरुवारी मंत्रालयात याप्रश्नी चर्चा होणार होती संघटनेचे पदाधिकारी मुंबईला गेले असले तरी संपावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.स्थानिक पातळीवर मात्र एकही कर्मचारी कामावर हजर नाही. कार्यालयामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार असे वरिष्ठ अधिकारीच काम करताना पाहायला मिळते.
राज्यात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहायकाकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसूल सहायक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते.
शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक दहा मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले आहे. परंतु, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्याय करत असल्याने हे पत्र तत्काळ रद्द करण्यात यावे, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.
विविध मागण्यासाठी कर्मचारी संघटनेने मागील १० दिवसांपासून पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात महसूल कर्मचारी सहभागी झाले असून संपावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.नायब तहसीलदारांच्या सरळ सेवेच्या फाईल मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊनही शासन निर्णय निघालेला नाही.त्यामुळे १० दिवस चाललेला संप मिटण्यासाठी महसूल मंत्री यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. यावेळी संपाच्या ठिकाणी केळापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
योगेश पडोळे
प्रतिनिधि पांढरकवडा