शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
14 हजारावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी घेतला लाभ
नागपूर: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातर्फे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांसाठी एडीआयपी योजना आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचे शिबिर रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात गेल्या 22 मार्चपासून आयोजित करण्यात आले आहे. येत्या 18 एप्रिलपर्यंत हे शिबिर चालणार आहे. यापूर्वीच या शिबिराला मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान 14 एप्रिल रोजी मात्र हे शिबिर बंद राहील, असे शिबिरप्रमुख बाल्या बोरकर यांनी काळविले.
रेशीमबाग येथे सुरु असलेल्या या शिबिरात आतापर्यंत 14 हजारावर ज्येष्ठ नागरिकांनी आणि दिव्यांगांनी भाग घेतला. या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती साधने वितरित करण्यात आली. तसेच 3 हजारापेक्षा जास्त दिव्यांगांनी शिबिराचा लाभ घेतला. या सर्व दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सहायक साधने या शिबिरात मोफत वितरित करण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक असलेली साधने देण्यात येत आहेत.
महापालिकेतर्फे झोनस्तरावर ही शिबिरे घेतली जात आहेत.