नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. ललीत राव मनापातील ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू प्रदान करून त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार केला.
आयुक्त सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, उपअभियंता राजेश दुफारे, स्वप्नील लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी श्री. ललीत राव यांच्या कार्याची प्रसंशा केली. महानगरपालिके मध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या सर्वांशी योग्य समन्वय साधून त्यांच्याशी संबंध वृद्धिंगत ठेवण्याच्या श्री. राव यांच्या शैलीचे आयुक्तांनी कौतुक केले. मागील दीड वर्षात शांत आणि संयमाने काम करणे, दिलेले काम वेळेत पूर्ण करणे, चूक झाल्यास ती पुन्हा होणार नाही याची काळजी एकूणच कर्तव्याप्रति असलेली समर्पण भावना श्री. ललीत राव यांच्या कार्यात नेहमी दिसून आली, असे सांगतानाच त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपायुक्त श्री. निर्भय जैन यांनीही श्री. ललीत राव यांच्या कार्याचे कौतुक केले. आयुक्त कार्यालयाचे काम शिस्तबद्ध आणि समन्वयाने करण्याची शैली श्री. राव यांना अवगत असून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही उणीव कार्यालयात भासत राहिल, असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना श्री. ललीत राव यांनी प्रशासनातील सर्व अधिका-यांचे आभार मानले. १९८४ ला पहिल्यांदा मनपामध्ये रूजू झालो. त्यावेळी मनपात प्रशासक होते आज निवृत्तीवेळीही प्रशासकांकडूनच सत्कार होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त कार्यालय, वित्त विभाग, ऑक्ट्रॉय, एलबीटी व पुन्हा वित्त विभाग आणि आयुक्त कार्यालय असा सेवेचा प्रवास या ३८ वर्षात झाला असून प्रत्येक ठिकाणी प्रशासनातील वरीष्ठ अधिका-यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे ते म्हणाले. आयुक्त कार्यालयात काम करताना मनपा आयुक्तांकडून मिळालेल्या सहकार्याप्रती त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व शेवटी आभारही मानले.
तसेच या कार्यक्रमाला सर्वश्री. राजन लांजेकर, श्रीकांत वैद्य, अनिल पाटील, प्रमोद हिवसे, जितेंद्र धाकते, राजेश वासनिक, संजय दहीकर, राजेश लोहितकर, नितीन निमजे, जितेंद्र तोमर, हर्षवर्धन जाधव, कमलेश झांझड, सचिन देशपांडे इत्यादी उपस्थित होते.