काँग्रेसचे राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिर सपन्न
नागपूर : कोणत्याही विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी व सशक्त व्यासपीठ आहे. मात्र, हल्ली या माध्यमाचा गैरवापर करून समाज तोडण्याचे कृत्य भाजपाद्वारे सुरू आहे. आम्ही मात्र या सोशल मीडियाच्या माध्यमातून वास्तव मांडून एकसंघ समाजनिर्मितीचे ध्येय पूर्ण करू, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने वनामती सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. या वेळी पूर्व केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता, काँग्र्रेस प्रवक्त्या अलका लांबा, सोशल मीडिया तज्ज्ञ अमेय तिरोडकर, सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, देशाची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. नागरिकांची दिशाभूल करायची व आपसांत भांडणे लावून सत्ता उपभोगायची हाच अजेंडा गोदी मीडियाचा आहे. पण, आता भाजपाच्या अपप्रचाराला चोख प्रत्यत्तर देण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सज्ज झाला आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही लढाई लढणार आहोत. पक्षातर्फे लीगल सेल निर्माण करण्यात आला असून, याद्वारे कार्यकर्त्यांवर होणा-या बेकायदेशीर कारवाईवर प्रतिबंध घातला जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडिया निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशाल मुत्तेमवार यांनी नवसंकल्प शिबिराच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. काही राजकीय पक्ष स्वार्थापोटी धर्म-जातीच्या नावावर माणसं तोडतात; आम्ही माणसं जोडण्याचे काम करू. सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा, तत्त्व सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या वेळी सोशल मीडिया तज्ज्ञांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिबिराला राज्यभरातील सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय नवसंकल्प शिबिर उद्या :
रविवारी, 29 मे रोजी वाडी – हिंगणा रोडवरील सॉलीटिअर बँकेट हॉलमध्ये राष्ट्रीय नवसंकल्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रवक्ते अलका लांबा, वरिष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश, सल्लागार सचिन राव, प्रवक्ते पवन खेरा तसेच काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व सोशल मीडिया क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.