नागपूर : १४ जून – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने नेमलेल्या आयोगा मार्फत सुरू झाले आहे. मात्र, अत्यंत चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा केला जात असल्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, अशी भूमिका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष असल्याचे मान्य केले आहे. यावर आज ( मंगळवारी ) भाजपाचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सुरुवातीलाच सांगितले होते की राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर टाईमपास करत आहे.
हे सरकार अनेकदा याच मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात तोंडघशी पडलेले असताना देखील सदोष पद्धतीने ओबीसींचा डेटा गोळा केला जातो आहे, तर मग सरकारचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे आयोग चुकत असताना दुसरीकडे राज्याचा दौरा करून काय साध्य होणार आहे? असा प्रश्न देखील बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. एका आडनावाचे अनेक समाजात लोक असतात मग आडनावाच्या आधारे ओबीसींचा सदोष डेटा गोळा करून सरकार ओबीसी समाजाचे नुकसानच करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आयोगाची अशीच कार्यपद्धती राहिल्यास हे सरकार पुन्हा तोंडघशी पडेल, असे देखील बावनकुळे म्हणाले.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचा डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष असल्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनीदेखील डाटा गोळा करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मान्य केले. त्यामुळे आता या मंत्र्यांनी इतर कामे बाजूला सारून पुढील आठ दिवसांत डेटा कसा गोळा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
वीज महावितरणकडून पाच ते पंचवीस पैसे पर्यंतची वीज दरवाढ केलेली आहे. वीज मंडळाने गुपचूप वीज दरवाढ करून जनतेवर अन्याय केला आहे. कोळसा स्वस्त उपलब्ध असतात महागडा कोळसा विकत घेऊन त्याचा भुर्दंड सामान्य जनतेला दिला जातो आहे. वीज मंडळांनी हा भुर्दंड सहन केला पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.