मुळात स्वयंपाक हा विषय माझ्या आवडीचा असल्यामूळे या क्षेत्रात अनेक प्रयोग मी केले, त्यामध्ये पाककला स्पर्धा, पुस्तकाचे लिखाण, कार्यशाळा, विश्वविक्रम इत्यादी कार्यक्रम राबवित असतो. मध्यंतरी एक अशी घटना घडली की त्यावेळी डोक्यात लख्ख प्रकाश पडला की ज्याप्रमाणे पुरुष व स्त्रीयांमध्ये ज्या भाव-भावना असतात तशाच भावना तृतीयपंथी लोकांमध्ये सुद्धा असतात याचा आपण विचारच करत नाही. त्यांना आपण वेगळया नजरेने बघतो.
पण त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. हे मला त्यांच्याबद्दल जास्त अभ्यास केल्यानंतर उमगले. त्यातलाच एक छोटा प्रयत्न म्हणून अशा विशिष्ट तृतीयपंथी समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमूळे या समाजाला त्यांच्यातील कला लोकांपर्यंत पोहचवता येईल, याशिवाय यातील कित्येक लोकं मुख्य प्रवाहात येऊन सामान्य माणसांसारखे काम करु लागतील. म्हणूनच नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या शहरात ही स्पर्धा घेण्यात आली.
तृतीय पंथासाठी संपूर्ण महाराष्ट्र आयोजित केलेली पाककला स्पर्धेची अंतिम फेरी आज दि. १५ जून रोजी दु. १२.०० ते 4.00 वा. जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन, नागपूर येथे घेण्यात आली. महाराष्ट्रातील विविध शहरातील एकूण १६ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांचे 8 जोडयात विभागणी केली होती, त्यांनी इथे प्रत्यक्ष पदार्थ तयार करुन दाखवला आणि शेवटी तीन जोडयांची निवड करुन त्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. प्रथम पारितोषिक निकिता-नेगण (पुणे), द्वितीय पारितोषिक मोहिनी-सोनू (नागपूर), तिसरे पारितोषिक, संतोषी-कलाश (पुणे) अशी विजेत्यांची नावे आहे. परिक्षकांच्या विनंती वरुन अजून एक काॅन्सोलेशन प्राईज मयुरी-श्रीदेवी (मुंबई) यांच्या जोडीला देण्यात आले.
ट्रान्सकुक या पाककला स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निरक्षण मैत्र्या लोवळेकर, अनुराधा हवालदार, विशाखा पवार, राधा सहस्त्रभोजनी व सुजाता नागपूरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भरत जेठवानी (सामाजिक कार्यकर्ता) व विजय जथे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डब्ल्यू सी ई चे सचिन शेडगे, युनिफाॅर्म अनलिमिटेडच्या सोनिया गोरे, यश सातपुते, दत्त महाराज (उमरेड), कांदबरी (सामाजिक कार्यकर्ता, पुणे) रानी (सामाजिक कार्यकर्ता, नागपूर) इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता टीम विष्णूजी की रसोई, मिलिंद देशकर, रेणू अग्रवाल व नचिकेत जामदार यांनी बरीच मेहनत घेतली.