मनपाद्वारे तक्रारींचे निराकरण : २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत
नागपूर : मागील तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्यासह अन्य अधिका-यांनी शहरातील विविध भागात प्रामुख्याने शंकरनगर, नरेन्द्र नगर, पडोळे चौक येथे पाहणी केली. आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना या भागात पाणी साचू नये या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त (घनकचरा) डॉ.गजेन्द्र महल्ले, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी विविध भागात भेट देउन पाहणी केली. याशिवाय मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार तैनात नियंत्रण कक्षामध्ये प्राप्त तक्रारींच्या आधारे मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे सेवाकार्य बजावून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यात आला.
बुधवारी १३ जुलै रोजी झाड पडण्याबाबत धरमपेठ झोन अंतर्गत जी.पी.ओ. चौक ते राजा राणी चौक या रोडवर, हिस्लॉप कॉलेज जवळ रोडवर आणि जुने आर.बी.आय. रामदासपेठ कॅनल रोड येथील तक्रार प्राप्त झाली. संबंधित झोन पथकाद्वारे तात्काळ सेवाकार्य बजावले व रस्ता मोकळा करण्यात आला. तर पाणी साचण्याबाबत लकडगंज झोन अंतर्गत मिल कॅन्सर हॉस्पीटल येथील तक्रार प्राप्त झाली. अग्निशमन पथकाद्वारे हॉस्पीटलमध्ये जमा पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात आली.