नागपूर :मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, परिसरातील नदी,नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगत खसाळा राख बंधारा येथील पाण्याची पातळी वाढल्याने ह्या बंधाऱ्यातून खसाळा, मसाळा, खैरी, कवठा गावांमध्ये नाल्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याचे, प्राथमिक वृत्त कोराडी वीज केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे. वीज केंद्राचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी तातडीने राख बंधारा स्थळी पोहचले तसेच जिल्हा प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले आहे.
राख बंधाऱ्यातून दुपारी १२ वाजेपासून ओव्हरफलो पाण्याचा विसर्ग वाढतच आहे. नैसर्गिक आपदा लक्षात घेता संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षीततेचा इशारा तातडीने देण्यात आला आहे. वीज केंद्र प्रशासन आणि जिल्हा प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे.
खसाळा राख बंधारा ३४१ हेकटर क्षेत्राचा असून सुमारे ७ किलोमीटर आतील जागेत राख साठवण करण्यात येते. ३.३० वाजताच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्धस्तरीय काम सुरू आहे.
कोराडी वीज प्रकल्पाचा खसाळा येथील राख तलाव फुटला त्यामुळे खसाळा येथील शेती व वस्ती पाण्याखाली गेली.तेथे पाहणी करून महाजनको कडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार चंदशेखर बावनकुळे यांनी दिले