Published On : Mon, Jul 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

चांदमारी वस्तीत इम्मू खान व साथीदारांची दहशत

Advertisement

वस्तीतील नागरिकांना संरक्षण द्या : ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी

नागपूर : वाठोडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चांदमारी वस्तीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना शस्त्रांच्या बळावर धमकावणे, महिला, तरुणींची छेड काढणा-या इम्मू खान वल्द सलीम खान, गब्बू, कालू आणि इतर १० ते १२ गुंडांपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

Gold Rate
15April 2025
Gold 24 KT 93,500/-
Gold 22 KT 87,000/-
Silver / Kg - 95,800/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इम्मू खान आणि त्याच्या साथीदारांच्या छळामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांनी नुकतीच ॲड. धर्मपाल मेश्राम यांची भेट घेतली आणि त्यांनी सहकार्याची मागणी केली. परिसरातील नागरिकांनी इम्मू खानच्या एका साथीदाराला धारदार शस्त्रासह पकडून वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन केले होते मात्र तो गुन्हेगार पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे. त्यामुळे येथील नागरिक भितीच्या सावटात जगत आहेत. याबद्दलही नागरिकांनी ॲड. धर्मपाल मेश्राम यांची भेट घेउन मदत मागितली आहे व त्यासंदर्भात निवेदनही दिले आहे.

इम्मू खान आणि त्याच्या साथीदाराच्या दहशतीपासून त्रस्त चांदमारी वस्तीतील नागरिकांनी सुमारे ३० नागरिकांच्या स्वाक्षरीसह वाठोडा पोलिस स्टेशनला पत्र सुद्धा दिले आहे. मात्र त्यावरही अद्याप कार्यवाही झालेली नाही. नागरिकांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार इम्मू खान वल्द सलीम खान रा. चांदमारी, गब्बू रा. सुरजनगर, कालू रा. पवनशक्ती नगर यांच्यासह इतर १० ते १२ साथीदार हे सर्व गुन्हेरागी प्रवृत्तीचे असून ते नेहमी दारू आणि मादक पदार्थांचे सेवन करून वस्तीत येतात, दंगा करतात, तरुण मुलींची छेड काढतात. रविवारी २४ जुलै रोजी उपरोक्त सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वस्तीत धारदार शस्त्र घेउन आले, किराणा दुकानात शिरून तेथील महिलांची छेड काढली, अर्वाच्च्य शब्दांत शिविगाळ केली, जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. वस्तीत दहशत निर्माण करणे, खंडणी वसूल करणे, मुलींची छेड काढणे अशा या नेहमीच्या प्रकारामुळे वस्तीतील नागरिकांनी उपरोक्त गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांपैकी एकाला पकडले. शमशाद काली नामक या गुन्हेगाराला पकडून नागरिकांनी वाठोडा पोलिसांच्या स्वाधिन केले परंतू तो पोलीसांच्या तावडीतून निसटून पळाला.

या सर्व गुंड प्रवृत्तीच्या इसमांमुळे वस्तीतील नागरिकांच्या जीविताला, संपत्तीला, अब्रुला धोका असून या गुंडांवर कारवाई करून संरक्षण देण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र यानंतरही संबंधित गुंड पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने नागरिकांनी मदतीसाठी ॲड. धर्मपाल मेश्राम यांची भेट घेतली आणि निवेदन दिले.

या संपूर्ण प्रकारावर पोलिस प्रशासनाद्वारे गांभीर्याने कार्यवाही करण्याची गरज ॲड. मेश्राम यांनी बोलून दाखविली. नागरिक आधिच दहशतीत असताना त्यांनी धैर्य दाखवून गुंडाला पकडले ही मोठी बाब आहे. मात्र यानंतरही पोलिस प्रशासनाला गुंडाला आपल्या ताब्यात ठेवता आले नाही ही बाब पोलिस प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. चांदमारी वस्तीतील प्रत्येक नागरिक आज या गुंड प्रवृत्तीच्या इसमांमुळे भितीच्या सावटात जगत आहे. येथील माता भगिनींच्या अब्रुला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या या तक्रारींवर पोलिस प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना पोलिस संरक्षण दिले जावे, अशी मागणीही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून पोलिसांना केली आहे.

Advertisement
Advertisement