कामठी – मतदार यादीतील मतदाराच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने कामठी तालुक्यात 1 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मतदार कार्ड सोबत आधार कार्ड जोडणीला सुरुवात होत आहे.यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे त्यासाठी तहसील प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेले बीएलओ मतदाराकडे आधार क्रमांक घेण्याकरिता येणार आहेत तेव्हा बीएलओ द्वारे देण्यात येणारा नमुना 6 ब अचूक भरून देण्यात यावा व या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा(सुधारणा)अधिनियम कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदाराकडून ऐच्छिकपणे आधाराची माहिती संग्रहित करणे बाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत त्या आधारे मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
कायदा व नियमांमध्ये केलेल्या सुधारणा नंतर मतदार नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तिकडून विहित स्वरूपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठो वैधानिकरित्या शिक्षक, तलाठी,कर्मचारी, ग्रामसेवक,ग्रामपंचायत लिपिक, शिपाई, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची नियुक्ती बीएलओ म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहेत.तेव्हा या मतदार कार्ड सोबत आधार जोडणी मोहिमेला यशस्वी करा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी चंद्रिकापुरे यांनी केले आहे.