-मागील दहा दिवसांत कामठी तालुक्यातील 4500 नागरिकांनी घेतले बूस्टर डोस!
कामठी :-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 व्या वर्षानिमित्त कामठी तालुक्यात ‘कोव्हिड व्हॅक्सीन अमृत महोत्सव अंतर्गत 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसात शासनाच्या वतीने नागरिकांना मोफत बूस्टर डोस लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.याबाबत शासनाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत या अनुषंगाने कामठी चे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी कोव्हिड लसीकरणाच्या प्रगतीचा टास्क फोर्स बैठकीत आढावा घेतला.
यावेळी बैठकीला प्रामुख्याने उपस्थित असलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी मोहीम सुरू झाल्यापासून या दहा दिवसांत कामठी तालुक्यातील 4500 नागरिकांनी मोफत बूस्टर डोस चा लाभ घेतल्याचे सांगितले तर हे लसीकरण कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात येणारे गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्र, भूगाव व गुमथी या प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी तीन ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे तसेच शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय , नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हुतात्मा स्मारक कामठी असे दैनंदीन 12 केंद्रावर लसीकरणाची सोय करण्यात आली असल्याचे सुदधा सांगितले.
याप्रसंगी बैठकीला कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, विस्तार अधिकारी गोपीचंद कातुरे प्रामुख्याने उपस्थित होते.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त वर्षे 18 ते 59 या वयोगटातील लाभार्थ्यासाठी कोव्हिडं लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 जुलै पासून 30 सप्टेंबर पर्यंत शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस लसीकरणास प्रारंभ झाला आहे.बूस्टर डोस चे प्रमाण वाढीवर आहेत.लाभार्थ्याकडून बूस्टर डोस च्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.तर ठराविक 75 दिवसात बूस्टर डोज देण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर असल्याने एक मोठे आव्हान आहे. तेव्हा तालुक्यात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लसीकरनाला गती द्या अशा सूचना तहसीलदार अक्षय पोयाम यांनी बैठकीत दिले.
यावेळी ज्या नागरिकाचे बूस्टर डोज घेणे अद्याप बाकी आहेत त्यांनी प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने नेमलेल्या लसीकरण केंद्रावरून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले.