नागपूर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागातील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी १८ जागा आरक्षित करण्यात आल्या असून सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी ३८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ३१ मे रोजी ओबीसींचा अपवाद वगळता आरक्षण काढण्यात आले होते. त्यात सर्वसाधारण प्रवर्गात ५६ जागा महिलांसाठी राखीव होत्या.
महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज महाल येथील नगरभवनात ओबीसींसाठी काही प्रभागात थेट तर काही प्रभागांसाठी सोडती काढत आरक्षण निश्चित करण्यात आले. महिलांच्या ५० टक्के आरक्षणानुसार ओबीसींसाठी जागा निश्चित करण्यात आल्या.
३१ मे रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीसाठी ३१ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यात महिलांसाठी १६ जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी १२ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यात सहा जागा महिलांसाठी राखीव आहेत. हे आरक्षण कायम ठेवत सर्वसाधारण प्रवर्गातील जागांमधून ओबीसींचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
ओबीसींसाठी एकूण ३५ जागा आरक्षित करण्यात आल्या. यातील १८ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. निवडणूक अधिकारी महेश धामेचा यांनी १८ पैकी नऊ जागा थेट आरक्षित करण्यात आल्या तर ९ जागा ईश्वर चिठ्ठीने आरक्षित करण्यात आल्याचे सांगितले. आता सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी ३८ जागा आरक्षित आहेत.
ओबीसीसाठी एकूण आरक्षित जागा ः ३५ (महिला १८)
सर्वसाधारणसाठी एकूण आरक्षित जागा ः ७८ (महिला ३८)
अनुसूचित जातीसाठी एकूण आरक्षित जागा ः ३१ (महिला १६)
अनुसूचित जमातीसाठी एकूण आरक्षित जागा ः १२ (महिला ०६)
ओबीसींसाठी आरक्षित प्रभाग
ओबीसी महिला ः ३ अ, ६ अ, ८ ब, ९ ब, १७ ब, १९ ब, २१ ब, २५ ब, २६ अ, २९ अ, ३१ अ, ३३ ब, ३४ ब, ४४ ब, ४६ ब, ४८ अ, ४९ अ, ५० अ.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग
सर्वसाधारण महिला ः १ ब, २ क, ३ ब, ५ ब, ६ ब, ७ ब, ८ क, ११ क, १२ क, १४ ब, १७ ब, १८ ब, २० क, २२ ब, २३ ब, २४ क, २५ क २६ ब, २७ ब, २८ ब, २९ ब, ३० ब, ३१ ब, ३२ ब, ३३ क, ३४ क, ३५ ब, ३६ ब, ४० ब, ४१ ब, ४२ ब, ४३ क, ४७ ब, ४८ ब, ४९ ब, ५० ब, ५१ क, ५२ क.