मुंबई – वाढती लोकसंख्या लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने घेतलेला वॉर्ड रचनेचा निर्णय रद्द करण्याची शिंदेसरकारला गरज नव्हती असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मनपा आणि जिल्हा परिषद वॉर्ड रचनेबाबत निर्णय घेण्यात आला त्यावर महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय परतवून लावायचे व रद्द करण्याचा सपाटा ईडी सरकारने लावला आहे. राज्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात वॉर्ड रचना आणि सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस एकनाथ शिंदे नगर विकास विभागाचे मंत्री होते मात्र आता त्यांना स्वतःच घेतलेला निर्णय हा मान्य नसल्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे असेही महेश तपासे म्हणाले.