– १३ ते १५ ऑगस्ट प्रत्येक नागपूकराने घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेद्वारे घरोघरी तिरंगा लावण्याचा संदेश देणारा बलून आकाशात सोडण्यात आला आहे. मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. व नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते बलून आकाशात सोडण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होतो आहे. या अनुषंगाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ हा विशेष अभियान राबविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात उत्साहात या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या दृष्टीने शहरातील शासकीय इमारती, ७५ चौक, दोन महत्वाचे मार्ग यावर रोषणाई केली जाणार आहे. मनपाद्वारे कमी दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
संपूर्ण शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने वातावरणनिर्मिती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने जनजागृती करणारे बलून तयार करण्यात आले आहे. हा बलून मनपा आयुक्तांनी आकाशात सोडून नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.