जागतिक छायाचित्रण दिनी ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान
नागपूर: कोरोना काळात विविध क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु असताना पोलिसांप्रमाणेच वृत्तपत्र छायाचित्रकारही रस्त्यावर उतरून काम करीत होते. या काळात अनेक अडचणींचा सामना करून घटनांची छायाचित्रे वाचकांपर्यंत पोहचविण्याचे वृत्तपत्र छायाचित्रकारांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आज हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
आमदार विकास ठाकरे, माहिती संचालक हेमराज बागुल, माजी मंत्री अनिस अहमद, केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक संचालक हंसराज राऊत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रगती पाटील, उद्योजक जसप्रीत अरोरा, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि केंद्रीय संचार ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार अजाबराव खारोडे आणि ज्येष्ठ कॅमेरामन विनय लोहित यांना स्व. उदयराव वैतागे स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
एखादी घटना घडल्यानंतर कोणतीही वेळ, स्थळ न पाहता वृत्तपत्र छायाचित्रकार तिथे पोहचून छायाचित्र टिपतात व वाचकांपर्यंत पोहोचवतात. बातमीमध्ये छायाचित्र असल्यास ती बातमी समजून घेण्यास वाचकांना मदत होते. त्यामुळे छायाचित्र आणि छायाचित्रकार यांचे विशेष महत्व असल्याचे सांगून श्री. अमितेश कुमार यांनी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना वृत्तपत्र छायाचित्रकारांशी सतत संपर्क आला. त्यांचे काम कौतुकास्पद असून त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांमुळे वाचकांना कोणत्याही घटनेची अचूक माहिती मिळण्यास मदत होते. नागपूर येथे काम करत असताना सर्वांनी खूप प्रेम दिले, येथील आठवणी नेहमी स्मरणात राहतील, अशा भावना मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केल्या
छायाचित्रण ही एक कला असून हा कला जोपासणारा छायाचित्रकार संवेदनशील व सजग असला पाहिजे. छायाचित्रकारांचे काम अतिशय आव्हानात्मक असून चांगले छायाचित्र टिपण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरु असते, असे आमदार श्री. ठाकरे यांनी सांगितले. तसेच नागपूर नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्यामाध्यमातून सुरु सामाजिक दायित्व जपण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
छायाचित्रकाराकडे तंत्र नव्हे तर दृष्टीकोन असणे महत्वाचे आहे. कॅमेरा कोणत्या प्रकारचा आहे, यापेक्षा त्या कॅमेरामागे असलेली नजर कोणत्या क्षमतेची आहे, यावर छायाचित्राचा दर्जा ठरतो. केविन कार्टरसारख्या छायाचित्रकाराचे एक छायाचित्रही हजारो शब्दात मांडता न येणाऱ्या वेदना, प्रसंग मांडते. समाजातील वेदना, समस्या लोकांसमोर आणण्याचे काम छायाचित्रकार करतात, त्याचप्रमाणे समाजातील सकारात्मक बदलांची नोंदही छायाचित्रकारांनी घेवून त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे माहिती संचालक श्री. बागुल यांनी सांगितले.
दृश्य स्वरूपातील कोणत्याही गोष्टीवर लवकर विश्वास ठेवला जातो. वृत्तपत्रातील बातमीसोबत छायाचित्र असेल तर ती बातमी अधिक परिणामकारक ठरते. त्यामुळे वृत्तपत्र छायाचित्रकारांचे महत्व अधिक असून समाजाच्या समस्या मांडण्यासाठी या घटकाची भूमिका महत्वाची असल्याचे माजी मंत्री श्री. अहमद यावेळी म्हणाले.
केंद्रीय संचार ब्युरोचे श्री. राऊत, श्रीमती पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश टिकले यांनी केले, तर महेश कुकडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनंत मुळे यांनी केले.