नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत केंद्र शासनाने ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका ‘नागपूर निती’ या नावाने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी १७ सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छ सुंदर नागपूरसाठी ‘प्लॉग रन’चे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. अमरावती रोड स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक परिसर (फुटाळा चौक) येथून ‘प्लॉग रनला’ सुरूवात होईल. नागरिकांनी स्वच्छ आणि सुंदर नागपूरसाठी मोठ्या संख्येत या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी अधिकारी व कर्मचा-यांना ‘प्लॉग रन’ विषयी सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त रविन्द्र भेलावे, निर्भय जैन, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके आदी पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या पहिल्या स्वच्छ भारत अभियानाला आठ आणि स्वच्छ भारत अभियान-२ ला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त ‘इंडियन स्वच्छता लीग’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ‘प्लॉग रन’ चे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबदल माहिती देत मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. म्हणाले की, स्वच्छतेच्या संदर्भांत नागपूर नेहमीच पुढे राहिले आहे. स्वच्छतेबाबत शहरात आवश्यक ते सर्व कार्य केले जात आहेत. घनकचरा संकलन, मार्ग स्वच्छ व सुंदर करणे विविध कार्य केले जात आहेत. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. तरी नागरिकांनी आपल्या वर्तवणुकीतून बदल आणणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. स्वच्छतेची सुरुवात नागरिकांनी स्वतः पासून करायला हवी, असे आवाहनही श्री राधाकृष्णन बी. यांनी यावेळी केले. तसेच प्लॉग रन सारख्या विविध उपक्रमात सर्वसामान्य नागरिक, युवावर्ग, सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, जेणे करून आपले शहर स्पर्धेत यशस्वी होईल असेही श्री. राधाकृष्णन बी. म्हणाले.
फुटाळा चौक ते दीक्षाभूमी प्लॉग रन’
स्वच्छ सुंदर नागपूरसाठी शनिवार १७ सप्टेंबर २०२२ रोजी होणाऱ्या ‘प्लॉग रन’ ची सुरुवात ७.३० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर (कॅम्पस), फुटाळा चौक पासून होणार आहे. प्लॉग रन दरम्यान विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, सर्वसामान्य नागरिक आपल्या श्रम दानाने मार्ग स्वच्छ करीत चालतील. प्लॉग रन हे अंबाझरी स्थित विवेकानंद स्मारक, व्हीएनआयटी, बोधिसत्व चौक (माटे चौक), श्रद्धानंदपेठ चौक या मार्गे दीक्षाभूमी येथे पोहोचेल. प्लॉग रन मध्ये सहभागी नागरिक दीक्षाभूमी परिसर स्वच्छ करतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/swachhayouthrally/register/ या लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी केले आहे. या प्लॉग रन मध्ये भाग घेणा-या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ मध्ये करण्यात आली आहे. विद्यापीठ परिसरात परत येणा-यांसाठी मनपा परिवहन विभागातर्फे बसेसची व्यवस्था दीक्षाभूमी येथून करण्यात आली आहे.