Published On : Mon, Oct 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यातून पत्नीची निर्दोष सुटका

Advertisement

सरोगसी करणे, अनैतिक संबंधांचे पत्नीवर आरोप

नागपूर: पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यातून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी पत्नीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.

अश्वीनी (नाव बदललेले) अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. अमितेश (नाव बदललेले) असे मृताचे नाव आहे. आरोपी महिला कामाच्या शोधात बेंगलूरू येथे सरोगसीकरिता गेलेली होती. प्रथम अमितेशने तिला सरोगसीचे काम करायला संमती दिली होती. त्यानंतर तो तिला हे काम करण्यास मनाई करीत होता.

Advertisement

पत्नी सरोगसीचे काम करीत असून तिचे तीन व्यक्तींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत होता. एका इसमाने पत्नी आंघोळ करतानाचे काही छायाचित्र पतीला पाठवले होते व त्याच्याकडून तो पैशाची मागणीही करीत होता. पत्नी व तिच्या प्रियकराच्या त्रासामुळे पतीने २२ डिसेंबर २०२१ ला आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याची गुन्हा पत्नी व पत्नीचा तथाकथीत प्रियकर नेहाल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली होती. तर प्रियकर अद्याप फरार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून पत्नीविरूद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश झपाटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सरकारी पक्षांनी साक्षीदार तपासले. सर्व पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी पत्नीची निर्दोष सुटका केली. आरोपी पत्नीतर्फे ॲड. मंगेश राऊत, ॲड. नाझीया पठाण यांनी बाजू मांडली.