Published On : Tue, Oct 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

भाजप व बाळासाहेबांची शिवसेना दोनशेवर विधानसभेच्या जागा जिंकणार

Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ः सध्याचे सरकार विकासाला गती देणारे

भंडारा: अनेक मोठे नेते भाजपात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. उद्याही निवडणूक झाली तरी भाजपा सज्ज आहे. २०२४ मध्ये भाजपा व बाळासाहेबांची शिवसेनेची युती कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राज्यात दोनशेवर विधानसभा तर ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याची तयारी केली असल्याचे आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सध्याचे सरकार विकासाला गती देणारे असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे विकासात अडथळे येणार नाही, अशी ग्वाही देताना पक्ष संघटना बळकटीकरणासाठी राज्यात दौरे करीत असल्याचे सांगितले. प्रत्येक बूथवर नवीन २५ कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात येईल. भाजप आणखी मजबूत करण्यासाठी योजना असून एका बूथवर ५० युवा वारिअर्स राहणार आहे. ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण बहाल केल्यामुळे समाजातील अठरा पगड जाती, बारा बलुतेदार भाजपमध्ये येताना दिसत आहे. महिला सक्षमीकरणाच्या योजनाही तयार करतो आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ तास काम करीत आहेत. दोन्ही नेते बुलेट ट्रेनसारखे वेगाने काम करीत असल्याने गेल्या अडीच वर्षाचा भंडारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०२४ मध्ये केंद्रातील सरकार व आताच्या सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवून नगर पालिका, मनपा, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा जिंकणार असल्याचे ते म्हणाले. एक कार्यकर्ता २० घरापर्यंत पोहोचून राज्य सरकारच्या योजना, आरोग्य सुविधा पोहोचल्या की नाही, यावर लक्ष ठेवणार आहे. यासाठी पालकत्व योजना तयार केली आहे. याशिवाय पाच कोटींवर जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचा लाभ मिळाला. त्यासाठी लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी असे एक पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत १५ लाख तर २०२४ पर्यंत दोन कोटी पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. आंतराष्‍ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कॉंग्रेसच्या काळात व आजच्या काळात तीन पटींचा फरक आहे. १० वर्षांपूर्वीच्या दराची तुलना आज करू शकत नाही. आमच्या सरकारने यात पाच ते सात रुपये कमी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वीच्या सरकारने आंतरराष्ट्रीय दरावर देशातील पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर ठरतील, असे करून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. तरीही याबाबत जनतेच्या भावना निश्चितच सरकारला कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातील तीन व नागपूर ग्रामीणच्या सहा, अशा एकूण नऊ विधानसभा मतदार संघावर स्वतः लक्ष देणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. भंडारा जिल्ह्याच्या विकासाबाबतही येत्या काळात मोठे परिवर्तन दिसेल, असेही ते म्हणाले.

Advertisement

पटोलेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

नाना पटोले यांना लंपी आजार झाला आहे. त्यांचे त्यांच्यावरील नियंत्रण सुटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली की प्रसिद्धी मिळते तसेच राहूल गांधी यांना खुश करता येते, त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. आता तर त्यांना त्यांच्याच मतदार संघात पराभवाची भीती वाटत आहे. गेल्या अडीच वर्षात ते भंडारा जिल्ह्यासाठी काहीही करू शकले नाही. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही. त्यामुळे राज्यात कॉंग्रेसची अधोगती झाली. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही बावनकुळे म्हणाले. वीर सावरकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वार बोलण्याची त्यांची लायकी नाही, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची मशाल कॉंग्रेसच्या हातात

उद्धव ठाकरे शिवसेना व त्यांचे मशाल चिन्ह कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कुबड्यावर आहे. त्यांंनी हिंदूत्वाचे विचार सोडला, त्यमुळे कुठलेही चिन्ह घेतले तरी मशाल पेटणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी संपूर्ण पक्षाचे, कार्यकर्त्यांचे नुकसान केले. आता त्यांचे हिंदुत्व पंजाच्या हाती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पंजाची मशाल कुणीही स्वीकारणार नाही. सामनातून काहीही आग ओकण्याचे काम करीत आहे. बाळासाहेब देवरस यांचा व शिवसेनेचा काय संबंध, असा सवालही त्यांनी केला. शिंदे-फडणवीस यांचे सरकार व मोदींचे आठ वर्षात केलेल्या कामे जनतेत घेऊन जाणार आहे. धनुष्यबाण गोठवल्याचा फायदा करून घेण्याचा आमचा उद्देश नाही. उद्धव ठाकरे पंजाशिवाय आता जगू शकत नाही, त्यामुळे आणखी वाईट परिस्थिती होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.