प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच रोज त्या पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. त्यांची यात्रा नेत्यांनी ताब्यात घेतली असून ती सामान्य कार्यकर्त्यांसाठी किंवा जनतेसाठी नाही, अशी टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केली.
ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासाच्या दरम्यान त्यांनी मीरा भाईंदर येथे पत्रकार परिषदेस संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नेत्यांची यात्रा पक्षाच्या मजबुतीसाठी असते. पण राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत होण्याच्या ऐवजी तुटत आहे. काँग्रेसचा एक राष्ट्रीय नेता महाराष्ट्रात येत आहे आणि दुसरीकडे रोज त्या पक्षाचे कार्यकर्ते फुटून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, यामुळे यात्रेबद्दल काय चित्र निर्माण होते, हे पाहण्यासारखे आहे. नंदूरबार जिल्ह्यातील तीन काँग्रेस नगरसेवकांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला.
त्याच्या आधी एक दिवस मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यात शिवाजीराव कर्डिले यांच्या पुढाकाराने सुमारे चारशे काँग्रेस कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. याचे कारण काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्याजवळ जाण्यासाठी ही यात्रा ताब्यात घेतली आहे. ती यात्रा सामान्य लोकांसाठी किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नाही.
ते म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद असताना उद्धव ठाकरे यांना लोकांना भेटण्याची व त्यांची कामे करण्याची संधी होती. पण ते अठरा महिने मंत्रालयातही गेले नाहीत. कोरोनाच्या काळात लोकांचे जीव जात होते, राज्याला गरज होती त्यावेळी विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्याचा प्रवास केला आणि कोरोना केंद्रातही जाऊन जनतेचे दुःख जाणून घेतले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी मात्र स्वतःचा जीव वाचविण्यासाठी स्वतःला बंदिस्त केले. वेळ होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही केले नाही, हे जनता जाणते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी कितीही दौरे केले तरी उपयोग नाही.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार मागे घेतला त्याच दिवशी रुतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला होता. त्यामुळे आता त्याबद्दल नव्याने प्रतिक्रिया देण्यासारखे काही नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.