वंदे मातरम च्या जयघोषाने दुमदुमला फ्रीडम पार्क परिसर
नागपूर : आदिवासी दुर्गम भागातील सुमारे 350 विद्यार्थ्यांनी मेट्रो ट्रेनमधून प्रवास करून कस्तुरचंद पार्क, खापरी आणि झिरो माईल स्टेशन आणि फ्रीडम पार्कला भेट दिली. महाराष्ट्रातील अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या प्रवासात आनंद व्यक्त केला. प्रवासादरम्यान, खडीमार गावाची रहिवासी असलेल्या एकल विद्यालयातील इयत्ता 6 वी ची विद्यार्थिनी समिक्षा खलाल हिचा 12 वा वाढदिवस ट्रेन मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समीक्षाने सांगितले की, आज माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, की मी मेट्रो ट्रेनमध्ये वर्गमित्र आणि शिक्षकांसोबत वाढदिवस साजरा करत आहे. यात्रेत नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यातील इयत्ता चौथी ते सातवी चे विद्यार्थी सहभागी होते.
कस्तुरचंद पार्कपासून मुलांनी मेट्रोचा प्रवास सुरू केला. प्लॅटफॉर्मवर जमलेल्या विद्यार्थ्यांनी मेट्रो ट्रेन पाहून आनंद झाला. प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ट्रेनचे मुलांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवासादरम्यान मुलांना मेट्रोशी संबंधित माहिती दिली. आपण पहिल्यांदाच मेट्रो गाडी बघितली आणि यात प्रवास करून आपल्याला मजा आल्याचे एकल विद्यालय परतवाडा येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कुणाल कासदेकर आणि आलापल्ली विद्यालयाची विद्यार्थिनी समिक्षा खेकरे यांनी सांगितले.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवस्थेसाठी मेट्रो प्रवासात एकल विद्यालयाचे सुमारे 20 शिक्षक, शिक्षिका आणि सहकारी सहभागी झाले होते. खापरी येथून झिरो माईल पर्यंत मुलांनी
परतीचा प्रवास केला.
झिरो माईल स्टेशन पाहून मुलं फ्रीडम पार्कला पोहोचली. फ्रीडम पार्क येथे मुलांनी प्रार्थना आणि देशभक्तीपर गीतांनी तेथील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आलापल्ली एकल अभियानाचे प्रमुख श्री नरेश गटमवार, श्री महेश बुरमवार, श्री संजू चौधरी, श्रीमती संगीता मडावी, श्रीमती आमटे यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, दुर्गम जंगल भागातील मुलांना शिक्षण देण्यासाठी एकल शाळा उघडण्यात आल्या आहेत. देशभरात एक लाखाहून अधिक एकल शाळा चालवल्या जात आहेत. शाळेत प्राथमिक शिक्षणाबरोबरच आरोग्य, ग्रामविकास आणि इतर अन्य विषयाचे शिक्षण दिले जाते.