मनपा हिरवळीवर दिले धरणे : राजकीय दबाव असल्याचा आरोप
नागपूर : नागपूर महानगरपालिकेमध्ये मागील १५ ते २० वर्षांपासून सेवारत असलेल्या कंत्राटी संगणक चालकांच्या जीवावर उठणारी अन्यायकारक निविदेचा राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनद्वारे निषेध नोंदविण्यात आला. अन्यायकारक निविदेच्या निषेधार्थ गुरूवारी (ता.१७) कंत्राटी संगणक चालकांनी मनपा मुख्यालयात हिरवळीवर धरणे दिले.
मागील सुमारे 20 ते 25 वर्षांपासून १८९ कंत्राटी संगणक चालक नागपूर महानगरपालिकेला सेवा देत आहे. त्यांना किमान वेतन कायद्याच्या नुसार वेतन व इतर लाभ देण्यात येतात. त्यावर त्यांचे कुटुंबीय उदरनिर्वाह करतात. त्यांनी मनपाला प्रामाणिकपणे सेवा देऊन कोरोना कालावधीत लॉकडाऊन असताना सेवा दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्याचे सोडून राजकीय दबावाला बळी पडून प्रशासन त्यांच्या जीवावर उठले आहे. शासन निर्णयान्वये किमान वेतन कायद्यानुसार त्यांना २०,६६६ रुपये वेतन असताना नवीन निविदा १५,५०० रुपये याप्रमाणे मागविण्यात आली आहे. सदर निविदा नियमबाह्य असून जे कार्यरत आहेत त्यांच्या रोजगाराची कुठेही जबाबदारी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय झाल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने मागविलेली निविदा ही १८९ कंत्राटी संगणक चालकांवर अन्याय करणारी असून त्याचा संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात येत असल्याचे राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाने सर्व कंत्राटी संगणक चालकांचे रोजगार अबाधित ठेवण्याची अट नमूद करावी व दोषपूर्ण असलेली निविदा रद्द करावी अशी मागणीही संघटनेद्वारे करण्यात आली आहे.