नागपूर: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंमलात आलेल्या भारतीय संविधानामुळे समाजातील प्रत्येकाच्या सेवेची संधी मिळाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील प्रजासत्ताक दिनी आपल्या नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ करण्याचा नागपूर महानगरपालिकेचा संकल्प आहे. ही संकल्पपूर्ती एकट्या मनपाने शक्य नसून यामध्ये जनतेची भूमिका आणि सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या संकल्पपूर्तीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी प्रजासत्ताक दिनी केले आहे.
नागपूर महानगरपालिकेमध्ये ७३वा प्रजासत्ताक दिन गुरूवारी २६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी राष्ट्रध्वज वंदन केले. याप्रसंगी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. अजय गुल्हाणे, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. राम जोशी, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, मनपा आयुक्तांच्या पत्नी यांची उपस्थिती होती. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वातील अग्नीशमन पथकाने मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि मान्यवरांना पथसंचालनातून मानवंदना दिली. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट या संकल्पनेवर घेण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पुढे बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी मनपातील सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहराच्या पूर्ततेसाठी कार्य करण्याचे सूचित केले. मागील ८ वर्षापासून सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर महानगरपालिकेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक विभाग, अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील प्रत्येक व्यक्तीचे योगदान आणि सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी आवर्जून नमूद केले. जनतेसाठी मनपाद्वारे स्वच्छ मोहल्ला स्पर्धा घेण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचेही त्यांनी आवाहन केले. आयुक्तांनी मनपाच्या विविध विभागांचा यावेळी उल्लेख केला. स्वच्छ आणि सुंदर नागपूरसोबतच स्वस्थ नागपूरसाठी मनपाच्या आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी विविध पाउल उचलण्यात येत आहेत. शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि प्रत्येक गल्ली, मोहल्ल्यात आरोग्य केंद्राची सुविधा पोहोचविणे हे उद्दिष्ट आहे. कोव्हिडमधून पुढे आल्यानंतर आता गोवर, कुष्टरोगासारखे आजार डोके वर काढत असताना यापासून लढण्यासाठी २४ तास आरोग्य यंत्रणा तत्पर असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आरोग्य आणि अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या अग्निशमन विभागाला मनुष्यबळासह अद्ययावत उपकरणांच्या गरजेची पूर्तता करून बळकट करण्याचा संकल्प आयुक्तांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची वाटचाल सुरू झाली आहे. आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर शहरात सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. या शाळांना उदंड प्रतिसाद असून मनपाच्या इतर शाळांमध्येही शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पारदर्शक आणि वेळेत प्रत्येकाला कर भरणा करण्याची सुविधा निर्माण करण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागपूर शहरातील महत्वकांक्षी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या कोनशिलेचे देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या प्रकल्पाच्या पुढील कार्यासाठी क्षेत्रीय पातळीवर कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे प्रत्येक सहायक आयुक्तांनी नियोजन करण्याचे आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले. महानगरपालिका ही संस्था दररोज नागरिकांपर्यंत पोहोचणारी संस्था आहे. शहराची पालकसंस्था म्हणून मनपाची जबाबदारी मोठी आहे. महानगरपालिकेमध्ये प्रचंड क्षमता आहे. नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा प्रदान करण्यासाठी मनपा सक्षम आहे. त्यादृष्टीने प्रत्येक विभाग, अधिकारी आणि कर्मचा-यांनी काम करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय गुल्हाणे यांनी ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून खास आहे. या विशेष वर्षात स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर ठेवण्यासाठी सर्व अहोरात्र प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, उपायुक्त श्री. विजय हुमने, घनकचरा व्यवस्थान विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, स्मार्ट सिटीचे महाप्रबंधक राजेश दुफारे, सहायक आयुक्त सर्वश्री अशोक पाटील, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व शुभांगी पोहरे यांनी केले व शेवटी आभार मानले.
उत्कृष्ट कार्यासाठी सन्मान
नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या कर्मचा-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जन्म-मृत्यू अधिनियम १९६९ मधील कलमम १३ (३) अंतर्गत जन्म-मृत्यू नोंदणीकरीता राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रलंबित सुमारे ११३६ प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता मनपाद्वारे उल्लेखनीय कार्य करण्यात आले. या कामगिरीसाठी मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी आणि जन्म-मृत्यू विभागाचे प्रमुख डॉ.अतीक खान व सांखिकी सहायक मुकेश शंभरकर यांना सन्मानित करण्यात आले. अग्निशमन विभागाचे चालक कम फिटर अंकेश सीताराम कापसे यांनी कोव्हिड काळात ऑक्सिजन पुरवठा करीत आयुष रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर लिकेज दुरूस्ती करून रुग्णांना सुविधा प्रदान केली. या कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय कळमना, डिप्टी सिग्नल येथे २० फूट खोल खड्ड्यात पडलेल्या पृथ्वी धनीराम मरवडे या १२ वर्षीय मुलाला बाहेर काढण्याचे कार्य करणारे कंत्राटी अग्निशमन विमोचक क्रिष्णा मोतीराम नरवटे यांचा सत्कार करण्यात आला. अतिवृष्टी काळात आपात्कालीन नियंत्रण कक्षामध्ये प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्याची जबाबदारी चोखरित्या पार पाडणारे वरिष्ठ लिपिक अरुण भोपळे यांनाही यावेळी मान्यवरांनी सन्मानित केले. तुळशी रोप, मनपाचा मानाचा दुपट्टा आणि प्रमाणपत्र प्रदान करून सर्व सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.
कुष्ठरोग निवारणाची शपथ
कार्यक्रमात उपस्थितांनी कुष्ठरोग निवारणाची शपथ घेतली. स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त कुष्ठरोग संशयीतांना तपासणी आणि उपचारासाठी प्रेरीत करणे तसेच कुष्ठरोगींशी भेदभाव न करणे व प्रोत्साहन देणे तसेच कुष्ठरोगमुक्त भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.