नागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडीया मार्टीन ग्रुप यांच्यावतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ चे आयोजन करण्यात आले.
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडुतील पट्टीपुरम येथून १५० पिको सॅटेलाईट रॉकेटसह अवकाशात सोडण्यात आले. या अभियानामध्ये नागपूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यशस्वी अभियान राबविले आहे. मा.आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी व मा. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांच्या पुढाकाराने या मोहिमेत विद्यार्थी सहभागी होऊ शकले. महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करून विद्यार्थ्यांना ऑन लाईन प्रशिक्षणाची सुविधा शिक्षणाधिकारी श्री राजेन्द्र पुसेकर तसेच सहा. शिक्षणाधिकारी श्री सुभाष उपासे व श्री राजेंद्र सुके यांनी मदत केली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेतील सुरेंद्रगढ माध्यमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती दिप्ती बिस्ट या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून तसेच श्रीमती करुणा टालाटुले, श्रीमती वंदना महाजन व श्रीमती पुष्पलता गावंडे या विज्ञान शिक्षिका यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.
या मिशनमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या मिशनची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. शालेय जिवनात अंतराष्ट्रीय तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात अवकाश संशोधन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी आपले योगदान दयावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना पिको सॅटेलाईट व रॉकेट बनविण्याचे प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात आले होते.