विरोधक त्यांची भूमिका पार पाडण्यासाठी बोलत असतात. ते त्यांचे कामच आहे. परंतु त्यांच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र मागे नेला. आता त्यांच्याकडे बोलायला काही नाही. त्यामुळे उठसूठ आरोप करावे लागत आहे, विरोधकांमध्ये सरकारला घेरण्याची हिंमत नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, विरोधक या सरकारला घेरू शकत नाही, कारण हे डबल इंजीन सरकार आहे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. त्यामुळे विरोधकांकडे काहीच मुद्दे नाहीत. शिवसेना सदस्यांच्या व्हिप बाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ठाकरे गटाने काय म्हणायचं ते म्हणू द्या, निवडणूक आयोगाने शिंदेंना धनुष्यबाण हे चिन्हे दिले आहे. ते धनुष्यबाणावर निवडून आले आहेत. त्यांच्या बी फार्मवरसुद्धा शिवसेना आहे, धनुष्यबाण आहे. त्यामुळे यांनी दिलेला व्हीप मानावा लागेल, नाही तर नियमाप्रमाणे जी कारवाई व्हायची ती होईल.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे आणि ते योग्य तो निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने सरकारचा निर्णय असेल. त्यामुळे त्यावर फार चर्चा करण्याची गरज नाही. योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागेल.
राहुल गांधी काय बोलतात, ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. त्यांच्या भाषणातले मुद्दे काय असतात, तेही कळत नाही. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे, हे मलाही कळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा प्रतिप्रश्न बावनकुळे यांनी केला.
सावरकरांचा इतिहास वाचला असेल, तर चार ओळी वाचल्यावर आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्यांच्या नावावरून घाणेरडे राजकारण केले जात आहे. राजकारणासाठी लोकांचा स्तर एवढा खाली गेला आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेवर आणि इतिहासावर वक्तव्य करायला लागले आहेत. यांनी खालची पातळी गाठली आहे. यापेक्षा खालची पातळी राजकारणात असू शकत नाही.
दिल्लीचे आपचे मंत्री मनीष सिसोदियांच्या चौकशीच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी थेट उत्तर दिले. ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांना वाटलं तर ते कुणाचीही चौकशी करू शकतात. चौकशीत त्यांना काही पुरावे मिळाले असतील म्हणून कारवाई झाली असेल, विरोधी पक्षाचे कामच आहे एजन्सीला विरोध करायचा. आतापर्यंत त्यांनी तेच केले आहे. कुठल्याही तपास यंत्रणा नियमांच्या बाहेर किंवा पुराव्याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे ज्याची कुणाची चौकशी सुरू झाली, त्यांनी फालतू विरोध करू नये, तर चौकशीला सामोरे जावे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करावे, आमच्या पक्षातही कितीतरी चौकश्या झाल्या. माझीसुद्धा चौकशी झाली आहे. पण आम्ही असं नाही केलं. निमूटपणे चौकशीला सामोरे गेलो आणि तपास यंत्रणेला सहकार्य केले, असे बावनकुळे म्हणाले.
सरकार आल्यानंतर किंवा सरकार नसताना दोन्ही वेळी जर आंदोलन करून न्याय मिळत नसेल. त्यामुळे आंदोलनात आमचे प्रतिनिधी गेले तर काही फरक पडत नाही. गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या आंदोलनात जावे, यात काही नवीन नाही. सरकारचे लक्ष वेधणे हे आमदाराचं कामच आहे, असेही ते म्हणाले.