नागपूर : नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून संघटनेची सदस्य नोंदणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ऐवजदार सफाई कर्मचा-यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहे. सफाई कर्मचा-यांसाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. कर्मचा-यांच्या हिताच्या दृष्टीने लाड पागे समितीच्या शिफारशी सुटसुटीत केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सर्व कर्मचा-यांच्या वतीने आभार मानले व धन्यवाद दिले.
नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या पुढील वाटचालीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढील काळात संघटना बळकट करणे, कर्मचा-यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यादृष्टीने कार्य करणे आदी विषयांवर चर्चा झाली. बैठकीत संघटनेचे कारदेशीय सल्लागार म्हणून ॲड. राहुल भानारकर यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली.
बैठकीमध्ये नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेद्वारे मनपा प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, ‘डिफाईंड काँट्रीब्यूशन पेन्शन सिस्टीम’ (डीसीपीएस) संबंधी मनपा प्रशासनाला व सरकारला जाब विचारणे आणि प्रशासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन उभारणे, सातव्या वेतन आयोगाचे थकीत वेतन व महागाई भत्ता मिळण्याबाबत प्रशासनाला निवेदन देणे व कार्यान्वित करणे, मनपामध्ये होणाऱ्या पदोन्नतीमध्ये पारदर्शीता आणने व कर्मचाऱ्यांना न्याय देणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना नागपूर मनपामध्ये क्रियान्वित करण्याबाबत नियोजन करणे, मनपा कर्मचारी बँक. लि नागपूरमध्ये कर्जासाठी येणाऱ्या विविध समस्या व त्यावर कसा तोडगा काढता येईल याचे जाब उपनिबंधक (सहकारी संस्था) ला विचारणे, प्रशासनाचे प्रत्येक विभागाचे परिपत्रक कर्मचा-यांचे आदेश, बदल्यांची संपूर्ण माहिती मनपाच्या अधिकृत पोर्टलवर टाकणे या करीता निवेदन देऊन कार्यान्वित करून घेणे आदी विषयांवर चर्चा करून मनपा प्रशासनाकडे मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत.
बैठकीत बैठकीत संघटनेचे कार्याध्यक्ष रोशन बारमासे, लोकेश मेश्राम, आशिष पाटील, सोनम बागडे, शंकर मेश्राम, विश्वास नागरकर, मंगेश गोसावी, दिपक खरे, विलास बोरकर, भोला खोब्रागडे, वासनिक, अरविंद वासनिक, चंचल पाटिल, बंटी चौधरी, दीप्तिजय बोरकर, कैलाश वंदूदे, राहुल पांडव, खिलावन लांजेवार आदींची उपस्थिती होती.